पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (दि. 2) विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने 6 गडी गमावून 336 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल (179*) आणि रविचंद्रन अश्विन (5*) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 41 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलने 34 धावा केल्या. श्रेयस अय्यर (27) आणि पहिली कसोटी खेळणारा रजत पाटीदार (32) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. अक्षर पटेल (27) आणि केएस भरत (17) धावा करून बाद झाले. इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी 2-2 बळी घेतले.
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपला जबरदस्त फॉर्म दुसऱ्या कसोटीतही कायम ठेवला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात तो 80 धावा करून बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याने 151 चेंडूंचा सामना करत आपले दुसरे शतक झळकावले. तो अद्याप 179 धावा (257 चेंडू) करून क्रिजवर आहे. त्याच्या त्याने 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून द्विशतकाची अपेक्षा असेल.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा निराशा केली आहे. रोहितला गेल्या 7 डावांत तर शुभमनला गेल्या 12 डावांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. गिलने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 128 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला 50 धावांचा टप्पाही स्पर्श करता आलेला नाही. गेल्या 12 डावात त्याने केवळ 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, 0 आणि 34 धावा केल्या आहेत. तर रोहितने गेल्या 7 डावात 14, 39, 24, 16*, 39, 0 आणि 5 धावा केल्या आहेत.
सुनील गावस्कर (4) यांनी 22 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयात सलामीवीर म्हणून भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके झळकावली आहेत. यशस्वी (2) शतकांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. यशस्वी हा 22 आणि त्यापेक्षा कमी वयाचा फक्त तिसरा सलामीवीर फलंदाज बनला आहे ज्याने दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा 150+ धावा केल्या आहेत.ग्रॅमी स्मिथने 4 वेळा, तर ख्रिस गेलने अशी कामगिरी केली आहे. यशस्वीने दोनवेळा अशी कामगिरी केली आहे. यशस्वीने गेलची बरोबरी केली आहे.