संदेशखाली हिंसेवर विरोधी पक्ष मौन का?; भाजपचा सवाल

रवीशंकर प्रसाद
रवीशंकर प्रसाद

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल मौन का आहेत? असा सवाल भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते व माजी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन संदेशखाली प्रकरणावर विरोधी पक्षांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की संदेशखालीबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने औपचारिक विरोध केलेला नाही. प्रत्येक विषयावर बोलणारे राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यावर मौन का बाळगत आहेत?

संबंधित बातम्या –

चंडीगडच्या घटनाक्रमावर सर्वजण बोलत आहेत. परंतु संदेशखालीमध्ये महिलांच्या मानसन्मानाच्या मुद्द्यावर ही मंडळी गप्प आहेत. यामागे केवळ मतांचे राजकारण आहे, याआधीही ही मंडळी तिहेरी तलाकवर मौन होती. सोनिया गांधी, डावे पक्ष तेव्हाही गप्प होते. आताही महिलांच्या प्रतिष्ठेवर गप्प आहेत, असा दावा रवीशंकर प्रसाद यांनी केला.

संदेशखालीचा विषय अतिशय गंभीर आहे. शाहजहां शेख संपूर्ण राज्य कसे वेठीस धरू शकतो. त्याला अटक का केली जात नाही. महिलांवर झालेले लैंगिक अत्याचार संपूर्ण लोकशाहीसाठी, सभ्य समाजासाठी शरमेची बाब आहे. ममता बॅनर्जी असूनही आरोपीला वाचवत आहेत. त्या काय लपवू पाहत आहेत, एक महिला मुख्यमंत्री आपली राजकीय प्रतिष्ठा वाचविण्यासाठी महिलांची अब्रु पणाला लावत आहेत, त्यांची सद्सद्विवेक बुद्धी कुठे गेली, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला. त्यांचा अत्याचार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दमनतंत्रापेक्षा पुढे गेला आहे, असाही आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news