कराची, वृत्तसंस्था : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पुढच्या वर्षी आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही, असे विधान केल्यापासून शेजारील देशातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी ताठर भूमिका घेणारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी आता गुडघे टेकले असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे, तसेच त्यांनी आयसीसीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
रमीज राजा यांनी यापूर्वी बीसीसीआय आणि भारत सरकारला विश्वचषक न खेळण्याची धमकी दिली होती. पुढच्या वर्षी आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही, तर त्यांचा संघ भारतात विश्वचषकही खेळणार नाही, असे ते म्हणाले होते.
'बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल'मध्ये एका संवादादरम्यान रमीज राजा म्हणाले, हा वाद बीसीसीआयनेच सुरू केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्यांची गरज आहे. विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान 90 हजार चाहते एमसीजीमध्ये आल्याचे तुम्ही पाहिले. मी आयसीसीबद्दल थोडा निराश आहे. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा.
रमीज राजा म्हणाले होते, भारतात होणार्या आगामी विश्वचषकात पाकिस्तानने भाग घेतला नाही, तर कोण बघणार? याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, जर भारतीय संघ इथे (पाकिस्तान) आला; तर आम्ही विश्वचषकासाठी जाऊ. जर तो आला नाही तर तो आमच्याशिवाय विश्वचषक खेळू शकतो. यावर आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे.
अधिक वाचा :