रघुनायका सारखा देव नाही।
क्रिया पाहता चौखडी सर्व काहीं ।।
मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाशिवाय या जगात कोणताच देव अवतार कार्यात आपली स्वतःची मर्यादा राखू शकला नाही. म्हणूनच श्री रामाला (Ram Navami 2024) 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून गौरविले जाते. जगताना आणि सामान्य माणसांमध्ये आपला ठसा उमटवताना आपला स्वतःचा असा एक आचार ठरविला जातो. ज्यावर या सुसंस्कृत भारताची ध्वजा फडकवली जाते. राम अयोध्येला परत आला, म्हणून गुढीपाडवा सर्व भारत वर्षामध्ये साजरा केला जातो. साखर वाटली जाते तीही हत्तीवरून. साखरेचे हार करून सर्वांच्या गळ्यात घालण्याची प्रथा त्या काळापासून आजही चालत आली आहे. (Ram Navami 2024)
प्रभू रामचंद्र हिंदू संस्कृतीचा, धर्माचा आत्मा आहे. प्रत्येक हिंदूंचे अंतरंग बालपणापासून संस्कारित होते, ते राम (Ram Navami 2024) कथेमुळेच. श्रीरामाच्या उत्तुंग आदर्शामुळेच आणि पराकोटीच्या स्वार्थ त्यागामुळे. त्याच्या चरित्राची उंची, महत्ता हिमालयासारखी आणि खोली महासागरासारखी आहे. रामाचा पराक्रम, शौर्य, नीती, धर्माचरण, विवेक, औदार्य, वचन पालन, एकपत्नीव्रत, इत्यादी श्रेष्ठतम गुणांची मोहिनी श्रेष्ठ-कनिष्ठ, राव-रंक, थोर-पोर, सामान्य- असामान्य, निरक्षर-पंडित सर्वांवर आहे.
हिंदू कुटुंब संस्थेचा आदर्श, श्रीराम-सीता आहेत. श्रीराम-श्रीकृष्ण यांच्या चरित्रावर हिंदू धर्माचा ध्वज गौरवाने फडकतो आहे. आचार्य, संत, महाकवी, तत्वज्ञ, सगळेच श्रीरामाच्या अद्वितीय चरित्राने स्तिमित झाले आहेत. 'राम' या शब्दामध्येच आपल्या सार्या जीवनाचा सार आहे. आपण सर्वांसाठी आदर्श कसं असावं हे उत्तम आणि उदात्त स्वरूप श्री रामप्रभूंकडून घ्यावं. ज्यांचं संबध जीवनच आदर्श बनलं त्या श्रीरामाविषयी काय सांगावं. ज्याच्या नामाने जीवनाचा खरा उद्धार होतो, ते नाम म्हणजे 'श्रीराम'.
ज्याच्यावर रामनामाचा प्रभाव जडेल, त्याची अवस्था म्हणजे पाण्यावर तरंगणाऱ्या निर्जीव, जड दगडाप्रमाणे होय. श्रीराम प्रभू काय होते हे जाणणे वरवर सोपे वाटत असले, तरी ते फार अवघड आहे. परंतु त्यांचा जीवन प्रवास सर्वांनाच आदर्श आहे. आणि जसाच्या तसा जरी राम जीवनामध्ये उतरवता नाही आला तरी, काहीसा आचरणात आणला तरी जीवनाची ही नौका तरुन जाण्यास खूप मदत होईल. म्हणूनच तो थोडासा समजून घेणे गरजेचे आहे. (Ram Navami 2024)
'श्रीराम' कसा आहे; रामाच्या ठिकाणी भावनांचा ओलावा निश्चित आहे; पण तरीही भावनेला मागे लोटुन तो नेहमी कर्तव्याला सामोरा गेला आहे. म्हणूनच त्याला मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात. रामाचे लोकांवर असामान्य प्रभुत्व होते. लहानांना सोडाच पण, त्याच्याहून वयाने आणि अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तींनाही तो प्रसंगी कर्तव्याचा उपदेश करू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रसंगी मोठ्यांनीही रामाचा हा कर्तव्य उपदेश मानला आहे. श्रीरामाविषयी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना वाटणारी अपार श्रद्धा, हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे.
कैकयीने रामाच्या यौवराज्याभिषेकात अडथळा आणला आणि रामावर वनवासाला जाण्याचा प्रसंग आला. या प्रसंगाने राजा दशरथाचे दुःख अनावर झाले. दशरथाला रामाचा वियोग सहन होण्याजोगा नव्हता म्हणून तो रामाला म्हणाला, कैकियेला दिलेल्या वरामुळे मी संभ्रांत झालो आहे. तू माझा निग्रह कर म्हणजे मला बंदी ठेव आणि वनवासाला न जाता अयोध्येचा राजा हो. पण राम हात जोडून दशरथाला म्हणाले, 'हे राजन्, तुम्ही सहस्र वर्षे पृथ्वीचे राज्य करा. मी अरण्यात राहील. मला राज्याची आकांक्षा नाही. चौदा वर्षे अरण्यात राहून तुमची प्रतिज्ञा पूर्ण केल्यावर मी पुनश्च परत येऊन तुमच्या चरणांना वंदन करीन. रामाचे हे नैतिक वचन केवळ त्याच्या परिवारावरच होते असे नव्हे, तर जे जे त्याच्या सहवासात आले त्यांना त्यांना रामाच्या व्यक्तिमत्त्वापुढे नमावेच लागले आहे. बिभिषणाने रावणाचा पक्ष सोडला आणि तो रामाला येऊन मिळाला. त्याने आपल्याला आश्रय देण्याची रामाला विनंती केली. बिभीषण हा शत्रू पक्षाचा आहे. तेव्हा त्याला आश्रय देऊ नये असेच सर्वांचे मत होते, परंतु रामाने त्या सर्वांच्या विरोधाला न जुमानता आपला निर्णय सांगितला. तो असा, "जो कोणी एक वार शरण येऊन मी तुमचा आहे व मला वाचवा असे म्हणेल, तो कोणीही असला तरी त्याला सर्व भूतांपासून अभय देणे हे माझे व्रत आहे. हे सुग्रीवा, मी बिभीषणाला अभय दिले आहे. तू स्वतः त्याला इकडे घेऊन ये. बिभीषणच काय, पण प्रत्यक्ष रावण जरी अभय मागायला आला तरी, मी ते त्याला अभय दिल्यावाचून राहणार नाही."
रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर जो राम दुःखावेगाने वृक्ष, पाषाण यांना मिठ्या मारून रडला, तोच राम रावणवधानंतर समोर आणून उभा केलेल्या सीतेला, वज्रकठीण शब्दाने वाक् ताडन करता झाला. पित्याने दिलेल्या वचनासाठी राज्यत्याग आणि चौदा वर्षांचा खडतर वनवास यांना धीरोदात्तपणे तोंड देणे या गोष्टींमुळेच राम आदर्श पुत्र झाला. कैकेयीने मागितलेले ते दोन वर रामाला सांगण्यासाठी दशरथाला शब्दच फुटेना. त्यावर रामाने काय प्रकार आहे, म्हणून कैकेयीला विचारले तेव्हा, कैकेयी म्हणाली, तु आज्ञा पाळणार आहेस तर सांगते, आपल्याविषयी कैकयीने शंका घेतली असे जाणून रामाला मरणप्राय दुःख झाले. तो म्हणतो, राजा- गुरु-पिता या सर्वच दृष्टीने माझे वडील मला सर्वस्वी आदरणीय आहेत. तेव्हा जे राजाचे अभिलषित असेल ते तू मला निश्चिंतपणे सांग. मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो की, त्याचे अभिलषित कितीही दुष्कर असले तरीही मी ते करीन. कारण 'राम' दोनदा बोलत नसतो.
'राम' हा आदर्श पती होता. प्रेम आणि निष्ठा या गोष्टी जर आदर्श पतित्वाच्या निदर्शक असतील तर, राम त्या बाबतीत उत्तुंग आदर्श आहे. सीतेवर त्याचे आत्यंतिक प्रेम होते. वनवासात तो तिची अनेक प्रकारे काळजी घेत असे आणि तिचे मनोरंजन करीत असे. वनात सीतेचा वियोग झाला तेव्हा त्याने, सामान्य माणसाप्रमाणे दुःखाचा पूर वाहवला. सीतेचा शोध घेण्यासाठी तो देहभान विसरून भटकला. हे प्रसंग त्याच्या उत्कट प्रेमाची साक्ष देतात. पुढे त्याने गर्भिणी सीतेचा आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. कालिदासाने त्याविषयी एक मार्मिक स्लोकार्थ लिहिला आहे. तो असा, लोकापवादाच्या भयाने रामाने सीतेला घरातून बाहेर घालवले. मनातून नाही. सीता त्यागानंतर रामाने राज्यविषयक सर्व भोग भावांच्या वाट्याला दिले आणि स्वतः विरक्त जीवन स्वीकारले. म्हणूनच राम हा एक पत्नी व्रताचा महान आदर्श ठरला. (Ram Navami 2024)
रामायणात निषाधाधिपती गुहक आणि वानरराज सुग्रीव हे दोघे रामाचे मित्र या नात्याने दिसतात. या संपूर्ण विश्वात रामा इतका दुसरा कोणीही प्रिय नाही असे गुहक शपथेवर सांगतो. रामाने ही त्याच्या बाबतीत म्हटले आहे, की मी माझ्या स्वतःवर जितके प्रेम करतो तितकेच गुहकावर करतो. कारण तो माझा सखा आहे. अग्नीसाक्षीने सुग्रीवाशी मित्रत्व जोडले गेल्यावर राम त्याला म्हणतो की, आपणा दोघांचे सुख-दुःख आता अगदी एकरूप झाले आहे. एकमेकांच्या उपयोगी पडणे हे मैत्रीचे फळ रामाने मान्य केले आहे. म्हणूनच त्याने सुग्रीवाच्या स्त्रीचे अपहरण करणाऱ्या वालीचा वध केला.
रामाने प्रजेवर आणि प्रजेने रामावर केलेले प्रेम पुराणे आणि इतिहासात अद्वितीय आणि अतुलनीय आहे. प्रजेसाठी राम कोणताही त्याग करायला कचरला नाही. प्रजेच्या कल्याणासाठी मी माझ्या बंधूंचा, पत्नीचा आणि स्वतःच्या प्राणांचाही त्याग करीन असे तो बोलला. प्रजेच्या मनात सीतेच्या चारित्र्याबद्दल किंतु उत्पन्न झालेला आहे. हे समजुन येताच त्याने यत्किंचितही विलंब न लावता आपल्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग केला.
राम हा सामर्थ्याचा महानिधी आहे. पण आपला पराक्रम त्याने धर्माच्या सिद्धीसाठी आणि प्रतिष्ठेसाठीच वापरला आहे. मारीच राक्षस हा रामाचा शत्रू होता, पण तोच जेव्हा रामाच्या पराक्रमाचे वर्णन करतो तेव्हा, त्या वर्णनाला विशेष गौरव प्राप्त होतो. मारीच म्हणतो, राम हा मुर्तीमंत धर्म आहे. तो सज्जन आहे आणि सत्य पराक्रमी आहे. देवांचा जसा इंद्र, तसा तो सर्व लोकांचा राजा आहे. धर्म हीच रामाच्या अंतकरणाची प्रेरक शक्ती होती. लक्ष्मणाला त्याने एकदा सांगितले की, मी जर संतापलो तर एकट्या आयोध्येचीच काय कथा पण, संपूर्ण पृथ्वी देखील पराजित करीन. पण मला तसे करता येत नाही. कारण तो अधर्म ठरेल. वनवासाची आपत्ती मी स्वीकारतो, याचे कारण माझा धर्म व सद्गती यांचे रक्षण व्हावे हेच आहे. रावणाबरोबर तो लढला आणि त्याने रावणाला मारले. पण त्याने त्याची अवहेलना कधीच केली नाही. रावण युद्धात पडल्यावर बिभीषण त्याची अंत्यक्रिया करण्यास तयार नव्हता. तेव्हा रामाने त्याला बजावले. रावण कसाही असो, पण त्याने शूर म्हणून अनेकवार रणांगणात किर्ती मिळविली आहे. जिवंतपणे त्याने साऱ्या विश्वाचा थरकाप उडवला होता. शत्रुत्व मरेपर्यंत असते. रावण मेल्यावर त्याचे व माझे शत्रुत्वाचे प्रयोजन संपले आहे. बिभिषणा तू त्याचा अंत्यसंस्कार कर. आता तो माझा शत्रू नसून, तुझ्याशी त्याचे जे नाते तेच माझ्याशीही आहे.
रामाचे कोणत्याही व्यक्तीशी वैर नव्हते, तर ताप, अधर्म व अत्याचार यांच्याशी त्याचे वैर होते. जगात आर्त हा शब्द राहू नये, एवढ्यासाठीच क्षत्रियांनी धनुष्य धारण करायचे असते. अशी त्याची धारणा होती. असा हा धर्मपरायण आदर्श 'राम' सर्वांनाच आदर्श होता आणि आहे व राहील. त्याच्या जीवनकथा आपल्याला जगायला उत्तम धैर्य देतील. 'श्रीराम' हे सज्जन प्रिय, विद्वानांचा व संस्कारांचा चाहते व आदर करणारे होते. म्हणूनच 'श्रीराम' हा सर्वांसाठी आदर्श राजा ठरला….।।
हेही वाचा :