प्रभू रामचंद्रांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या दहा अवतारांंपैकी सातवा अवतार मानण्यात येते. प्रत्येक प्राणिमात्रात ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला 'राम' असे म्हटले जाते. म्हणजेच राम हा प्रत्येक प्राणिमात्राशी आणि मानवसमूहाशी निगडित आहे. प्रभू रामचंद्रांच्या तत्त्वांचा, ध्येय उद्दिष्टांचा, मूल्यांचा परामर्श घेतला असता असे दिसते की, त्यांनी आदर्श मूल्यांसाठी उत्कृष्ट, लोककल्याणकारी राज्य चालवले. महात्मा गांधीही अशाच 'रामराज्या'चे पुरस्कर्ते होते आणि प्रभू रामचंद्रांच्या उच्च ध्येयवादाचे आणि मूल्यांचे पुरस्कर्ते होते.
इतिहासातील प्रत्येक क्षण शाश्वत, चिरंतन आणि गतिमान असतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनकार्याचे खरे सार कशामध्ये असेल, तर त्यांनी प्रतिकूल परिस्थिती, संकटे आणि वेदना यांवर मात करून मिळवलेला भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ अशा मानवी मूल्यांचा विजय होय. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांची जडणघडण झाली. मात्र, माता कौसल्या आणि पिता दशरथ यांचे कैकयीच्या हट्टापुढे काहीही चालले नाही आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने 14 वर्षे वनवास पत्करला. जीवनातील संघर्षाअंती श्रेष्ठ मूल्ये, प्रेम, मानवता आणि समानता सिद्धीस नेली. वनवासकाळात त्यांना अनन्य यातनांना सामोरे जावे लागले. रावणाने प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी असणार्या सीतेचे अपहरण केले. प्रभू रामचंद्रांनी निकराचा संघर्ष करून विजय मिळवला. रावणाच्या लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी 'रामसेतू'ही उभारला. हा रामसेतू म्हणजे दंतकथा आहे, असे मानले जात होते; परंतु नासा या अमेरिकन संशोधन संस्थेने फ्लोरिडा येथून उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रात सागरामध्ये दक्षिणेतील रामेश्वरपासून कोलंबोपर्यंत उत्तम पद्धतीने रामसेतू उभारल्याचे सबळ सज्जड पुरावे आढळले आहेत. त्यावरून रामाने बांधलेला सेतू ही कपोलकल्पित गोष्ट नसून प्रत्यक्षात घडलेली आहे, हे स्पष्ट होते. बी. बी. लाल या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी रामायण पुरातत्त्वाचा पाया घातला. त्यांनी केलेल्या पाहणीत बाबरी मशिदीच्या ठिकाणी प्रथमतः 12 खांब आढळून आले होते. तेथे वापरलेल्या प्राचीन भारतीय हिंदू मंदिरातील स्थापत्यांचा शोध त्यांनी विकसित केला. या प्रक्रियेतून रामायण पुरातत्त्व आकारास आले. पुढे या ज्ञानशाखेचा विकास इतक्या प्रभावीपणे झाला की, प्रभू रामचंद्रांच्या जीवनात आलेल्या घटना व घडामोडी या प्रत्यक्ष पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर आता अयोध्येमध्ये अत्यंत सुंदर आणि देखण्या राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे.
महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेले 'रामायण' आणि व्यासांनी लिहिलेले 'महाभारत' या केवळ दंतकथा आहेत आणि त्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही, अशी पाश्चात्यांची धारणा भारतीय संस्कृतीबद्दल अविश्वास निर्माण करणारी होती. परंतु, पुरातत्त्व संशोधनांनी त्या केवळ महाकथा नव्हत्या हे सिद्ध केले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा सदैव कायम राहिला आहे. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा समावेश अग्रक्रमाने होतो. त्यांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या दहा अवतारांंपैकी सातवा अवतार मानण्यात येते. 'विष्णुसहस्रनामा'मध्ये राम हे विष्णूचे 394 वे नाव असल्याचा संदर्भ सापडतो. काही अद्वैत वेदांतप्रेरीत ग्रंथांमध्येही रामाचे परब—ह्माचे आदीभौतिक स्वरूप सूचित करण्यात आले आहे. प्रा. अॅडम्स यांच्या मते 'राम' हा संस्कृत शब्द इतर इंडोयुरोपियन भाषांतही आढळतो. प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे आकलन लोकपुरातत्त्वीय द़ृष्टीने केले असता असे लक्षात येते की, या महामानवाच्या जीवनाचे यशोसूत्र संघर्षात आहे. एकवचनी, एकपत्नी, एकबाणी अशा प्रभू रामचंद्रांचे जीवनयश हे मर्यादाशील जीवनात आहे. पुढे चालून नीतीशास्त्रातील कोणत्याही वचनाचा संदर्भ लावला, तर रामाचे जीवन हे लख्ख, ठसठशीत मूल्यप्रेरणांनी तेजस्वी आणि तेजःपुंज बनल्याचे लक्षात येते. मूल्यांसाठी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून प्राप्त झालेले विलक्षण तेज हे श्रीरामचंद्रांच्या चरित्राचे खरे सार होय. प्रभू रामचंद्रांनी जो संघर्ष केला, तो केवळ सत्तेसाठी नव्हता, तर मूल्यांसाठी होता. हे 'रामायणा'च्या सखोल विश्लेषणातून लक्षात येते. प्रत्येक प्राणिमात्रात ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला 'राम' असे म्हटले जाते. म्हणजेच राम हा प्रत्येक प्राणिमात्राशी आणि मानवसमूहाशी निगडित आहे. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांना वनवासींनी खूप सहाय्य केले होते. भारतात सुदूर पसरलेल्या डोंगराळ भागात वनवासींच्या आदर्श आणि अद्भूत शक्तीने भारतीय मूल्यांची प्रस्थापना करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना लोकहृदयात अधिष्ठित केले.
वाल्मीकींनी 'रामायण' लिहून प्रभू रामचंद्रांना साहित्याच्या दालनात अमर केले. तर तुलसीदासाने 'रामचरित मानस' हा ग्रंथ लिहून संपूर्ण हिंदी भाषक उत्तर भारतात प्रभू रामचंद्रांना मध्ययुगातही अजरामर करून ठेवले. मराठीमध्ये ग. दि. माडगुळकरांनी रचलेल्या 'गीत रामायणा'ने तीन पिढ्यांवर गारूड केले. तसेच दक्षिणेतील आंध— प्रदेश, तामिळनाडूसारख्या राज्यांतही रामायणाचा लोककला-लोकजीवनात समावेश दिसून येतो. प्रभू रामचंद्र दंडकारण्यात वनवासात असताना त्यांची आणि अगस्ती ऋषी यांची भेट गोदावरी तीरी झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच प्रभू रामचंद्रांना दक्षिणेत प्रवास करण्यास तुळजापूरच्या तुळजाभवानीने दिशादर्शन केल्याचे 'तुळजा महात्म्य' या संस्कृत ग्रंथात नमूद केले आहे. प्रभू रामचंद्रांचा अंतिम काळ किंवा त्यांचे महानिर्वाण हे जलसमाधी तत्त्वानुसार घडून आले. आपले ऐतिहासिक कार्य संपवल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीत प्रवेश केला आणि या नदीच्या खोल पात्रात जाऊन त्यांनी आपल्या जीवनाची इतिश्री केली. प्रभू रामचंद्र आणि सीता यांची कथा आणि संघर्षमय मूल्य प्रस्थापनेची कथा आहे. रामाने नीतीमत्ता व आचारतत्त्वे कधीच पायदळी तुडवली नाहीत. आपल्या प्रजेचे कल्याण करण्यावर त्यांनी भर दिला. अयोध्येत परतल्यानंतर त्यांचा राज्यकाळ हा अत्यंत कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श होता. ज्या काळात अंधार होता त्या काळात प्रभू रामचंद्रांनी मानवता, लोककल्याण ही मूल्ये घेऊन आपला राज्यव्यवहार चोखपणाने केला. 'प्राण जाए पर वचन न जाए' या तत्त्वाची पहिली प्रस्थापना प्रभू रामचंद्रांनीच केली. प्रभू रामचंद्रांचे पुत्र लव आणि कुश यांनी त्यांचा अश्वमेधाचा घोडा अडवला. हा अश्वमेधाचा घोडा जिथे अडवला ते स्थान छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड जवळील लवगड नांद्रा हे स्थान म्हणून दाखवले जाते.
सीतेच्या अपहरणाची गोष्ट साकारणार्या कथा बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. ज्या जटायूने ही बातमी प्रभू रामचंद्रांना सांगितली आणि मगच प्राण सोडला, त्या जटायूचे मंदिरही बीड जिल्ह्यात आहे, अशी दंतकथा आहे. प्रभू रामचंद्रांच्या तत्त्वांचा, ध्येय उद्दिष्टांचा, मूल्यांचा परामर्श घेतला असता असे दिसते की, प्रभू रामचंद्रांनी आदर्श मूल्यांसाठी उत्कृष्ट, लोककल्याणकारी राज्य चालवले त्यामुळेच त्यास 'रामराज्य' असे म्हटले आहे. महात्मा गांधीही अशाच रामराज्याचे पुरस्कर्ते होते आणि प्रभू रामचंद्रांच्या उच्च ध्येयवादाचे आणि मूल्यांचे पुरस्कर्ते होते. भारतीय संस्कृतींच्या देशी किंवा परदेशी अभ्यासकांनीही प्रभू रामचंद्रांच्या ध्येयवादी विचारांचा परामर्श घेताना त्यांच्यातील दीपस्तंभाची उंची विचारात घेतल्याचे दिसते. प्रभू रामचंद्रांचा आयुष्यकाळ त्रिपुरापासून रामेश्वरपर्यंत, रांचीपासून कराचीपर्यंत ब—ह्मदेशापासून गांधार देशापर्यंत सर्वदूर पसरला आहे. याचाच अर्थ अखंड भारताच्या उभारणीचा श्रीगणेशा प्रभू रामचंद्रांसारख्या आदर्श व ध्येयवादी राजाने केला, असे म्हणता येईल. म्हणून अखंड भारताचे पहिले उद्गाते म्हणून प्रभू रामचंद्रांनाच म्हणावे लागेल.