नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाला कटू निर्णय घ्यावे लागले तरी पक्ष घेईल, पक्षासाठी संघटना सर्वोपरी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु यांचा राजीनामा घ्यावा लागला तरी पक्ष घेईल, असे संकेत दिले आहेत. दरम्यान हिमाचल प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा, प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला उपस्थित आहेत. काही तासात आढावा घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना अहवाल सोपवण्यात येणार आहे. Himachal political crisis
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांना काँग्रेसने हिमाचल प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी दिली होती. ६८ विधानसभा सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत ४० आमदार काँग्रेसचे आहेत. असे असतानाही पक्षाच्या ६ आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराला सारखी मते मिळाली. त्यात भाजपचे उमेदवार ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. आणि अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला असुन पक्षाने ताबडतोब तिन वरीष्ठ नेते आणि प्रदेश प्रभारी यांना हिमाचलला पाठवले आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा, प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला यांचा यात समावेश आहे. पुढच्या काही तासात आढावा घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना हे नेते अहवाल सोपवतील. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष यावर निर्णय घेतील. दरम्यान, सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस कठोर भुमिका घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु, प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला यांच्यावर कारवाई होऊ शकते. Himachal political crisis
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, डिसेंबर २०२२ मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि सर्वांनी प्रचार केला. मात्र काँग्रेसला जनादेश मिळाला. दरम्यान, मागील वर्षी राज्यात प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर केंद्राने राष्ट्रीय आपत्ती घोषित केली नाही. तसेच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. कांग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी ही निवडणूक जिंकू शकले नाही, याचे दुःख आहे, असेही ते म्हणाले.
दुर्दैवाने निवडणुकीत मतविभाजन झाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून पाठवलेल्या नेत्यांना सर्व आमदारांशी बोलण्यास सांगितले आहे. त्यांची मते जाणून घेण्यास सांगितले आहे. लवकरच हे निरीक्षक काँग्रेस अध्यक्षांना अहवाल पाठवतील. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष तातडीने निर्णय घेतील. असेही जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. आमची प्राथमिकता सरकार वाचवणे आहे. हिमाचल प्रदेशच्या जनतेने मोदी सरकारासह जे. पी. नड्डा अनुराग ठाकूर यांना विधानसभेत नाकारले होते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा