औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडूण आलेले एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची माजी खासदार राजू शेट्टी यांनी अमरावती येथील शेतकरी मेळाव्यात पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान शेट्टी हे विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी भुयार यांना स्वाभिमानीमध्ये घेण्याबाबत वक्तव्य केले.
यावेळी शेट्टी म्हणाले की, आमदार देवेंद्र भोयार यांच्या हकालपट्टीबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट केली, पुन्हा निवडून यायचे की नाही, याचा विचार त्यांनी करावा, चळवळीच्या शिस्तीत काम करणाऱ्याना संघटना पुन्हा घेण्यास तयार असते, तेथील लोकांनी ठरविले तर माझी हरकत नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान दोन दिवसांपुर्वी आमदार भुयार यांची राजू शेट्टी यांनी हकाल पट्टी केली होती. यानंतर त्यांनी आज हे वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चाना उधान आले आहे. शेट्टी यांनी भुयार यांची हकालपट्टी करत त्यांच्यावर घाणाघाती आरोपही केले होते.
ते पुढे म्हणाले की, ईडीच्या धाडी या भ्रष्टाचारांविरोधात नाही, तर बदला घेण्यासाठी पडत आहेत, मुंबईत गँगवार पाहिले, सध्या महाराष्ट्रात राजकीय टोळी युद्ध सुरू आहे, या राजकीय टोळी युद्धाचा अनुभव जनता घेत आहे, पीकविम्यात भ्रष्टाचार करणाऱ्या विमा कंपन्यावर का धाडी पडल्या नाही, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
शेट्टी म्हणाले, राज्यात अनंत प्रश्न असताना नको त्या विषयांकडे लक्ष केंद्रित केले जात आहे, अनेकांचे रोजगार गेले, फी न भरल्याने शिक्षण सम्राटांनी त्या मुलांना परिक्षेपासून वंचित ठेवले, या शिक्षण सम्राटांना सरकारने चाप लावला नाही, बहुतेक शिक्षण सम्राट हे सत्ताधारी व विरोधी पक्षात आहेत, गेल्या पाच दिवसापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत, त्यावर चर्चा करावी, असे कुणालाही वाटत नाही.
साखर कारखाने वारेमाप वाहतूक खर्च आकारून शेतकऱ्यांना कमी एफआरपी मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत, सरकारने यावर निर्बंध आणावेत, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, खासगी कारखान्यांना आम्ही हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सगळीकडे साम्राज्यवाद आहे, मोठे पक्ष छोट्या पक्षाला गिळण्याचा प्रयत्न करत आहेत, आधी छोट्या पक्षाची मदत घेऊन सत्ता मिळवायची, आपले लोक निवडून आणायचे, छोट्या पक्षातून निवडून आलेल्यांना आमिषे दाखवायची, सगळ्याच छोट्या पक्षासोबत असे घडत असते,त्यामुळे संस्कार करून लोकप्रतिनिधी घडविल्यास ते निष्ठेने पक्षात राहतील, याचा आता विचार करण्याची गरज आहे, असे शेट्टी म्हणाले,
यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र भोयार यांच्या हकालपट्टीबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट केली, पुन्हा निवडून यायचे की नाही, याचा विचार त्यांनी करावा, चळवळीच्या शिस्तीत काम करणाऱ्याना संघटना पुन्हा घेण्यास तयार असते, तेथील लोकांनी ठरविले तर माझी हरकत नसल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर उत्तर महाराष्ट्र निवडणुकीबाबत अद्याप भूमिका निश्चित केलेली नाही, तसेच महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा यापुढेही चालू ठेवायचा की नाही, याबाबत ५ एप्रिल रोजी कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.