धुळ्यातील हत्यार तस्करीचे राजस्थान, जालना कनेक्शन

धुळ्यातील हत्यार तस्करीचे राजस्थान, जालना कनेक्शन

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर राजस्थानकडून येणाऱ्या स्कार्पियोमधून सापडलेल्या हत्याराच्या साठ्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. हा शस्त्रसाठा जालना येथे जाणार होता असे स्पष्ट झाले असून आतापर्यंत येथील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्यार तस्करी मागचा खरा सुत्रधार शोधण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी, धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असणाऱ्या सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे पथकासह परिसरात गस्त घालत असताना शिरपूर शहराच्या दिशेने संशयित स्कार्पिओ (एम एच 09 सीएम 0015) दिसली. पोलिस पथकाने वाहनाला थांबण्याचा इशारा केल्यानंतरही चालकाने वाहन महामार्गावर भरधाव नेली. त्यामुळे पोलिस पथकाने वाहनचालकाचा पाठलाग करून चौकशी केली. यामध्ये वाहनामधून जालना येथील राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद रहीम सय्यद रहीम आणि कपिल दाभाडे (सर्व. रा. जालना) या चौघांना ताब्यात घेतले आहे. तसेच वाहनाची तपासणी केली असता त्यात एकूण 90 तलवारी आढळून आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्याराचा साठा आढळल्याने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तपासात हत्यार राजस्थान मधून जालना येथे जात असल्याचे तपासात पुढे आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने जालना येथून आणखी दोघांना अटक केली. या दोघांनी हत्यार तस्करी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि गाडी उपलब्ध करून दिल्याची बाब तपास पथकाला निदर्शनास आली. विशेषता ही गाडी यापूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरून अनेक वेळेस राजस्थान येथे गेल्याची बाब देखील पुढे येते आहे.

दरम्यान, जाताना व येताना या गाडीच्या चालकाने वेगवेगळे रस्ते वापरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. विशेषत राजस्थानमधून आलेल्या या तलवारी सिरोही प्रकाराच्या असून त्यावर पाच वर्षाची वॉरंटी असल्याचा शिक्का देखील आहे. ही तलवार अत्यंत घातक स्वरूपाची असून ती एखाद्या मोठ्या विघातक कामासाठी वापरल्या जाणार असल्याचा प्राथमिक संशय असला तरी हा कट नेमका काय होता, या पर्यंत अद्यापही तपास पथक पोहोचलेले दिसत नाही.

विशेषतः राजस्थान राज्यातील हत्यारांची तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांना शोधण्यासाठी गेलेल्या पथकाला अद्याप देखील हा हत्यार तस्कर सापडला नसल्याची बाब निदर्शनास येते आहे. या सर्व हत्यार तस्करीच्या प्रकरणाची राज्य आणि केंद्राच्या तपास यंत्रणेने देखील दखल घेतल्याचे बोलले जात आहे. विशेषतः ही हत्यार तस्करी एखाद्या मोठ्या कटाचा भाग असल्याची चर्चा खानदेशात सुरू आहे. त्या दिशेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी तपास सुरू केला असून मुख्य म्होरक्याला गजाआड करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news