सावाना अध्यक्षपदी दिलीप फडके, वसंत खैरनार यांचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

सावाना अध्यक्षपदी दिलीप फडके, वसंत खैरनार यांचा ‘इतक्या’ मतांनी पराभव
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाईन 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक वाचनालयाच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष अशा तिन्ही महत्त्वाच्या पदांवर ग्रंथालयभूषण पॅनलने बाजी मारली असून, अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके, तर उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सुनील कुटे व वैद्य विक्रांत जाधव विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी ग्रंथमित्र पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार वसंत खैरनार यांचा 73 मतांनी पराभव झाला.

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व 15 कार्यकारिणी सदस्य यांच्यासाठी रविवारी (दि. 8) मतदान घेण्यात आले. एकूण 6 हजार 139 मतदारांपैकी 3 हजार 904 जणांनी म्हणजे 63.18 टक्के मतदारांनी हक्क बजावला. सभासदांना निकालाची उत्सुकता होती. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची मतमोजणी असली, तरी काही मतदारांनी एकाच पेटीत तिन्ही मतपत्रिका टाकल्या असल्याने सर्वच मतपेट्या उघडण्यात आल्या. ही मतमोजणी सुमारे चार तास चालली. ग्रंथालयभूषण पॅनलच्या प्रा. दिलीप फडके यांना 1,977, तर 'ग्रंथमित्र'च्या वसंत खैरनार यांना 1,904 मते मिळाली. प्रा. फडके यांना विजयी घोषित करण्यात आले.

दुपारी 3.30 वाजता उपाध्यक्षपदासाठीची मतमोजणी सुरू झाली. त्यात चौथ्या फेरीअखेर 'ग्रंथालयभूषण'चे दोन्ही उमेदवार प्रा. डॉ. सुनील कुटे व वैद्य विक्रांत जाधव यांनी 'ग्रंथमित्र'चे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व मानसी देशमुख यांचा पराभव केला. प्रा. डॉ. सुनील कुटे यांना 1,987, वैद्य विक्रांत जाधव यांना 2,027, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांना 1,826, तर मानसी देशमुख यांना 1,690 मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. शंकर सोनवणे यांनी विजयी घोषित करताच 'ग्रंथालयभूषण'च्या उमेदवार, समर्थकांनी एकच जल्लोष केला. मतमोजणीमुळे सावाना आवारात मोठी गर्दी झाली होती.

फेरमोजणीचा अर्ज : प्रा. दिलीप फडके यांना 73 मतांनी विजयी घोषित करण्यात आल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार वसंत खैरनार यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली. या सगळ्या प्रक्रियेत पाऊण तास गेला. मात्र, खैरनार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने पुढील कार्यवाही टळली. या काळात काहीसा तणावही निर्माण झाला.

उमेदवारांची घालमेल सुरू : कार्यकारिणी सदस्यपदासाठी पंधरा जागा असून, त्यासाठीची मतमोजणी मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 पासून मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे तिन्ही उमेदवार 'ग्रंथालयभूषण'चे आल्याने कार्यकारिणी सदस्यपदाबाबत काय होते, याबाबत उमेदवारांत घालमेल सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news