Raj Thackeray Nashik | आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून ‘जय श्रीराम’, काळारामाचे घेणार दर्शन

Raj Thackeray Nashik | आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून ‘जय श्रीराम’, काळारामाचे घेणार दर्शन
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळारामाचे दर्शन घेत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील काळारामाचे दर्शन घेत, जय श्रीरामचा नारा देणार आहेत. विशेष म्हणजे यंदाचा पक्षाचा वर्धापन दिन ते नाशिकमध्येच साजरा करणार असून, त्यात ते लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. (Raj Thackeray Nashik)

आगामी लोकसभा निवडणुकीची लवकरच आचारसंहिता लागू केली जाण्याची शक्यता असून, सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बऱ्याच महिन्यांनतर नाशिक दौरा करीत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी लाेकसभा निवडणुकीला बराच अवधी असल्याचे सांगत, मनसेच्या संभाव्य उमेदवाराबाबत कुठलेच सुतोवाच केले नसल्याने इच्छुकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आता राज ठाकरे लवकरच काळारामाचे दर्शन घेण्यासाठी नाशिकला येणार असल्याने, या दौऱ्यात त्यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याबरोबरच मनसेच्या संभाव्य उमेदवाराबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येत्या ९ मार्च रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहेत. हेच औचित्य साधून राज ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन मुंबई सोडून नाशिकला साजरा करण्याच्या तयारीत आहेत. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, याठिकाणी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी ८ मार्च रोजीच ते नाशिकमध्ये सहपरिवार दाखल होणार असून, याच दिवशी ते काळारामाचे दर्शन घेणार आहेत. (Raj Thackeray Nashik)

पंतप्रधान, उद्धव ठाकरे अन् आता राज (Raj Thackeray Nashik)

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनीदेखील काही दिवसांपूर्वीच काळारामाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडला. आता मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील काळारामाचे दर्शन घेऊन सभा संबोधित करणार असल्याने, ते नेमका कोणत्या मुद्याला हात घालतात, याकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

पक्षाअंतर्गत इच्छुकांच्या तलवारी मॅन

काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी, पक्षातील इच्छुकांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत यांच्या जीवावर निवडणुका लढवून अपयश पदरात पाडून घेण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पक्षातील इच्छुकांनी आपल्या तलवारी मॅन केल्याचे सध्या चित्र आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसेचे एक ॲपही पदाधिकाऱ्यांना दिले असून, त्याद्वारे मतदारांची नोंदणी करून त्यांना पक्षासोबत जोडण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. अशात मनसेचा लोकसभेचा नेमका 'प्लॅन' काय हे राज ठाकरेंच्या सभेतून स्पष्ट होईल.

पक्षाचा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा केला जाणार असल्याने, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असून, पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. नाशिककरांचे आणि राज ठाकरे यांचे नाते नेहमीच घनिष्ठ आहे आणि पुढेही राहणार आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राज्यभरातून पदाधिकारी येणार असून, राज ठाकरे सभेतून आम्हा सर्वांना संबोधित करणार आहेत. काळाराम मंदिरात दर्शनासाठीदेखील ते जाणार आहेत.

– सुदाम कोंबड, शहराध्यक्ष, मनसे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news