Papua New Guinea tribal violence | पापुआ न्यू गिनी हादरले! आदिवासींच्या रक्तरंजित संघर्षात ६४ ठार | पुढारी

Papua New Guinea tribal violence | पापुआ न्यू गिनी हादरले! आदिवासींच्या रक्तरंजित संघर्षात ६४ ठार

पुढारी ऑनलाईन : पापुआ न्यू गिनीच्या उत्तरेकडील भागात झालेल्या आदिवासींच्या रक्तरंजित संघर्षात ६४ लोक ठार झाले आहेत. हा घटना अलीकडीलच्या इतिहासातील सर्वात मोठा आदिवासी संघर्ष म्हणून पाहिली जात आहे. याबाबतचे वृत्त ‘अल जझीरा‘ने स्थानिक माध्यमांचा हवाल्याने दिले आहे. पापुआ न्यू गिनीच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात आदिवासींच्या जमातींमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी ६४ मृतदेह आढळून आले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने पॅसिफिक देशांच्या अलीकडील इतिहासातील हे भीषण हत्यांकाड असल्याचे म्हटले आहे.

पोस्ट-कुरिअर वृत्तपत्राने स्थानिक पोलिसांचा हवाला देत म्हटले आहे की, एन्गा प्रांतातील वापेनमांडा जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून हे हत्याकांड सुरू झाले. या भीषण संघर्षात ॲम्ब्युलिन आणि सिक्कीन जमाती तसेच त्यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग होता, असेही त्यात म्हटले आहे.

पोलिसांनी पोस्ट-कुरियर वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, त्यांनी सोमवारी सकाळपर्यंत रस्त्याच्या कडेला पडलेले आणि वापेनमांडाच्या टेकड्यांमधून सुमारे ६४ मृतदेह बाहेर काढले.

या संघर्षावेळी प्रतिस्पर्धी गटांनी AK47 आणि M4 रायफल्स सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा वापर केला, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे. येथील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, असेही त्यात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) ने म्हटले आहे की हिंसाचारात त्याच जमातींचा समावेश होता ज्यात गेल्या वर्षी एन्गा प्रांतात ६० लोक मारले गेले होते.

देशाच्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जॉर्ज काकास यांनी म्हटले आहे की, “एन्गा तसेच संपूर्ण डोंगराळ प्रदेशातील, अगदी पापुआ न्यू गिनीमधील हे सर्वात मोठे हत्याकांड आहे.” ” आम्ही सर्व उद्ध्वस्त झालो आहोत. आम्ही सर्व मानसिक तणावाखाली आहोत,” असे काकास यांनी ‘एबीसी’शी बोलताना सांगितले.

एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, पोलिसांना घटनास्थळावरून ग्राफिक व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत, ज्यात रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत, रक्ताने माखलेले मृतदेह दिसून आले आहेत. फ्लॅटबेड ट्रकच्या मागील बाजूस मृतदेहांचा खच पडल्याचेही आढळून आले आहे.

एएफपीच्या वृत्तानुसार, लष्कराने या भागात सुमारे १०० सैनिक तैनात केले आहेत. परंतु त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या खूप कमी आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी व्यक्त केली चिंता

या घटनेचे पडसाद पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीमध्ये उमटले आहेत. विरोधकांनी हिंसाचारग्रस्त भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यासह जलद कारवाईची मागणी पंतप्रधान जेम्स मारा यांच्याकडे केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “पापुआ न्यू गिनीतून येत असलेली माहिती खूप वेदनादायी आहे,” असे त्यांनी सोमवारी एका रेडिओ मुलाखतीत म्हटले. “आम्ही विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि पापुआ न्यू गिनीमधील सुरक्षेसाठी पुरेसा पाठिंबा देत आहोत.”

हे ही वाचा :

 

 

Back to top button