पुढारी ऑनलाईन: दक्षिण अरबी समुद्रात ३१ मे दरम्यान दाखल झालेल्या मान्सूनने तिथेच मुक्काम ठोकला आहेत. अगदी धिम्या गतीने तो दक्षिण अरबी समुद्रातून पुढे सरकत आहे. अद्याप मान्सून दाखल होण्याची कोणतीही अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेली नाही; पण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचे ढग दिसत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना आज (दि.०४जून) वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात सुसाट्याच्या वारा, विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस (Rain forecast) पडणार असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आसे आहे.
सध्या भारतीय हवामान विभागाकडून मान्सून (Rain forecast) वर्तवली आहे. दरम्यान आज (दि.०४ जून) पुढच्या चार ते पाच तासांत ठाणे, अहमदनगर, हिंगोली, जालना आणि पुणे जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सातारा, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, पुणे या जिल्ह्यांत देखील वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. तर उद्या (दि.०५ जून) विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढच्या ४८ तासांत म्हणजे ५ जूनपर्यंत दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाब निर्माण होणार असून, चक्रीवादळाची निर्मिती होणार होण्याची शक्यता असल्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. इराणवरील पश्चिमी विक्षोभामुळे पुढील ४-५ दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमध्ये पुढील दोन दिवसांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर तापमान वाढण्याची अपेक्षा असल्याची माहिती दिल्ली IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.नरेश कुमार यांनी दिल्याचे 'एएनआय'ने वृत्तात दिले आहे.