पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (दि.२५) सलग दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी छापेमारेची कारवाई सुरु ठेवली आहे. जी स्क्वेअर (G Square) रिअल्टर्स या खासगी कंपनी संदर्भात ही कारवाई होत आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाशी या कंपनीचा संबंध असल्याचा आरोप होत आहे.
तामिळनाडूतील डीएमके (DMK) संबंध असलेल्या रिअल इस्टेट फर्मच्या जागेवर आयकरमधील आयटी विभागाने सोमवारी (दि.२४) पहिल्यांदा छापे टाकले होते. दरम्यान, आयटी विभागातील अधिकाऱ्यांकडून जी स्क्वेअर या रिअल इस्टेट कंपनीच्या मालमत्तांची झडती घेतली गेली. या रिअल इस्टेट कंपनी संदर्भात तामिळनाडूत सुमारे ५० ठिकाणी शोध सुरू आहे.
जी स्क्वेअरही रिअल इस्टेट कंपनी राजकीय वादात अडकली होती. येथील विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी द्रमुकच्या प्रमुख नेत्यांवर राज्यात या रिअल इस्टेट कंपनीला वेगाने वाढण्यास मदत केल्याचा आरोप केला होता. आयकर विभागाच्या कारवाईमुळे तमिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. या छापेमारीच्या निषेधार्थ संतप्त डीएमके कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.