शासकीय योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा, आ. आशुतोष काळे; तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप | पुढारी

शासकीय योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा, आ. आशुतोष काळे; तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

कोळपेवाडी(नगर): पुढारी वृत्तसेवा: शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी तळागाळातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला आहे. यापुढील काळातही प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देवून एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.

तहसील कार्यालय कोपरगाव येथे सोमवार (दि.24) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना, दिव्यागांना दिव्यांग प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड व शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, मागील 1 वर्षात कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 9 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.

4500 कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देण्यात आले आहेत. दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी पुढाकार घेवून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यागांना व त्यांच्या नातेवाईकांना जाण्यासाठी केलेल्या मोफत सुविधा व सहकार्यातून जवळपास 700 दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यात यश आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील अतिशय कमी वेळात आणि कमी श्रमात जातीचा दाखला मिळावा, यासाठी ‘जातीचा दाखला सहाय्यता शिबिर’ या जातीचा दाखला सहाय्यता शिबिराच्या माध्यमातून जातीच्या दाखल्यांची 2 हजार प्रकरणे शासन दरबारी दाखल करण्यात आली असून लवकरच त्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे आ. काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी घुले, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक नानासाहेब चौधरी, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, दिगंबर बढे, साहेबलाल शेख, योगेश गंगवाल, प्रशांत घुले, शैलेश साबळे व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाभार्थ्यांना दाखले मिळाल्याने त्यांनी आमदारांना धन्यवाद दिले.

दाखला शिबीर ठरले नागरिकांसाठी मोठे वरदान

आ. आशुतोष काळे यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा राबवून विद्यार्थ्यांना देखील जातीचे दाखले लवकरात लवकर मिळावे यासाठी राबवीत असलेले ‘जातीचा दाखला सहाय्यता शिबिर’ अशा उपक्रमांमुळे नागरिकांना होणारा मोठा त्रास वाचला आहे. हे उपक्रम जनतेसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरले असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.

Back to top button