पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पेंगॉन्ग तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि रॉबर्ट वाड्रा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील वीरभूमी येथे त्यांना पुष्पहार अर्पण केला.
'चीनचा आपल्या जमिनीवर कब्जा'
कलम ३७० रद्द केल्यानंतर राहुल यांची ही पहिली लडाख भेट आहे. आपल्या दौऱ्यात ते कारगिल स्मारकालाही भेट देऊन तेथील तरुणांशी संवाद साधणार आहेत. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ३० सदस्यीय लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) कारगिल निवडणुकीच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या कारगिल परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भाजप विरोधात निवडणूकपूर्व युती केली आहे. राहुल गांधी गुरुवारी लडाखमध्ये पोहोचले. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान ते लेहला भेट देऊ शकले नव्हते. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील भाषणादरम्यान त्यांनी लवकरच लेहला भेट देणार असल्याचे सांगितले होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला आहे. चिनी सैन्य घुसले असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. चीनने आमची जमीन बळकावली असल्याचेही लोक सांगतात, असे ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीत आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
हेही वाचा :