पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन ( Raghuram Rajan ) हे एका मुलाखतीमध्ये केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. भारताच्या महासत्ता होण्याच्या कल्पनेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केलेल्या विधानामुळे साेशल मीडियावर ते प्रचंड ट्राेल झाले आहे.
एका मुलाखतीमध्ये येत्या दहा वर्षांत आम्ही तुम्हाला देशाचे अर्थमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून पाहू शकतो का? या प्रश्नाला उत्तर देताना रघुराम राजन म्हणाले की, मी भारताबद्दल बोलू नये, अशी अनेकांची इच्छा आहे. भारत महासत्ता असण्याची मला पर्वा नाही, माझ्या दृष्टीने तो मुद्दाच नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा पूर्ण करणे मला महत्त्वाचे वाटते, असे राजन यांनी स्पष्ट केले.
रघुराम राजन यांनी भारत महासत्ता कसा होईल या प्रश्न दिलेले उत्तर नेटकर्यांना आवडले नाही. भारताच्या प्रगतीमध्ये अन्य नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल राजन यांनी दुर्लक्ष करत आहेत. त्यांचे विचार आत्मकेंद्रित असून राष्ट्राच्या सामूहिक प्रयत्नांना नाकारतात, अशी टीका काही युजर्संनी केली आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या मतावर नाराजी व्यक्त करत भारत महासत्ता होण्याबाबत राजन यांचा उदासीन दृष्टीकोन असल्याचे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून रघुराम राजन हे केंद्रीय मंत्री, केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते यांच्या निशाण्यावर आहेत. अलीकडेच एका शोधनिबंधात राजन यांनी भारतातून मोबाईल फोनची वाढती निर्यात पाहता केंद्र सरकारच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, 'पीएलआय' योजना केवळ मोबाइल फोनच्या असेंबलिंगवर भर देते, उत्पादनावर नाही. निर्यातीपेक्षा आयात जास्त होत आहे.
राजन यांना उत्तर देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी Linkedin वर लिहिलं होतं की, शोधनिबंधात लिहिलेल्या गोष्टी खोट्या तथ्यांवर आधारित आहेत. कारण जे काही इलेक्ट्रॉनिक उत्पादन आयात केले जात आहे ते केवळ मोबाईलच्या उत्पादनासाठी केले जात आहे. राजन यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासह स्मार्टफोन उत्पादनाची माहिती नाही.
हेही वाचा :