National Student Day : JEE मेन्स परीक्षेतील राधानगरीच्या ‘स्वरुप’चे यश प्रेरणादायी

National Student Day : JEE मेन्स परीक्षेतील राधानगरीच्या ‘स्वरुप’चे यश प्रेरणादायी
सोनाली जाधव; पुढारी : बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की, आपण जेईई परीक्षा पास होऊन आयआयटीमध्ये प्रवेश करावा आणि आपली आवडती नोकरी करावी. पण ज्ञानाचा कस लावणारी ही परीक्षा पास होणं तसं जिद्द, कष्ट, सातत्य आणि संयमाची कसोटी असते. हीच परीक्षा कोल्हापुरच्या सडोली खालसा सारख्या छोट्या गावातील टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने जेईई मेन्स परीक्षा पास होऊन आयआयटीमध्ये प्रवेश करत यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाने ग्रामीण भागातील मुलांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. त्याचं नाव आहे स्वरुप जयराम धनवडे. आज राष्ट्रीय विद्यार्थी दिन, त्यानिमित्ताने आपण  स्वरुपच्या यशाची गोष्ट जाणून घेऊया. (National Student Day)
स्वरुप आपल्या कुटूंबियासोबत…
स्वरुप आपल्या कुटूंबियासोबत…

National Student Day : जिद्द, कष्ट, सातत्याच्या जोरावर यशाला गवसणी


राधानगरी तालुक्यातील धामोड (ता.राधानगरी) गावच्या स्वरुप जयराम धनवडे अवघड समजली जाणारी जेईई परीक्षा पास झाला आहे. त्याच्या या यशाने ग्रामीण भागातील मुलांना यशाचे एक उदाहरण घालून दिले आहे. स्वरुप आणि त्याचे कुटुंबीय हे कामानिमित्त सध्या सडोली खालसा (ता.करवीर) येथे स्थायिक आहेत. स्वरुपचं चौथीपर्यंतच शिक्षण केंद्रशाळा सडोली येथे झाले. त्यानंतर सातवी पर्यंचचे शिक्षण रयत शिक्षणसंस्थेची शाळा रा. बा. पाटील विद्यालय येथे झाले. आठवीच्या शिक्षणादरम्यान त्याला दीपस्तंभ संस्थेबद्दल समजलं. तिथे त्याला विविध स्पर्धात्मक परीक्षांची ओळख झाली. त्याचवेळी त्याला समजले की आठवीमध्ये असतानाही तुम्ही नवोदयची परिक्षा देऊ शकता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला दीपस्तंभमध्ये अभ्यासासाठी पाठवले.
दरम्यान त्याच्या बहिणीचीही नवोदयसाठी निवड झाली होती. "मी ही परीक्षा पास होऊ शकतो" आणि आई-बाबाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत स्वरुपने कष्टाच्या जोरावर एनएमएस परीक्षा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिला आला. स्कॉलरशिप परीक्षेत तो राज्यात २२ वा आला. त्यानंतर त्याची नवोदयसाठी निवड झाली. त्यापैकी त्याने नवोदयची निवड करत पुढील नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे पूर्ण केले.  (National Student Day)

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेलोशिपसाठी पात्र

अभ्यासातील सराव आणि कष्टाच्या जोरावर स्वरुपने दहावीला ९३.८ टक्केवारी मिळवली. अकरावी आणि बारावीचे काही महिने शिक्षण कोरोनामुळे ऑनलाईनच झाले. त्याला आयआयटीमध्ये जायचं आहे हे माहित होतं पण त्यासाठी अभ्यास कसा करावा याची काहीच कल्पना नव्हती. त्या दरम्यान त्याने विचार केला की, पुढे कॉलेजच शिक्षण घ्यायचं आहे तर भरमसाठ फी भरावी लागणार. तो पैसा कुठून उभा करायचा. यासाठी त्याने त्याचा आवडता विषय फिजिक्सची चांगली तयारी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दक्षिणा फाऊंडेशनची शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि तिही त्याने अभ्यासाच्या जोरावर मिळवली.

टेलरिंगचा व्यवसाय करत आई-बाबांनी बळ दिलं

स्वरुपचे बाबा जयराम हे धामोडमध्ये हाताला काम मिळत नसल्याने ते कामानिमित्त सडोली खालसा येथे आले. तेथे त्यांनी टेलरिंगचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी  संसाराला हातभार मिळावा म्हणून आपल्या पत्नीलाही टेलरिंगमधील शिक्षण दिलं. दोघे मिळून संसाराचा गाडा चालवू लागले.

National Student Day : संशोधनात काम करायचं आहे…

स्वरुप आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत नेहमीच अव्वल राहिला आहे. नुकताच तो आयआयटी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र झाला आहे. त्याला विचारले असता तो म्हणतो. "मला संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था व भारतीय अंतराळ संशोधन संस्थांमध्ये काम करायचे आहे. 

स्वरुप जयराम धनवडे
स्वरुप जयराम धनवडे

ही आहेत भारतातील आयआयटी

भारतात एकूण २३ आयआयटी महाविद्यालय आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे, आयआयटी खडकपूर, (पश्चिम बंगाल), आयआयटी मुंबई, (महाराष्ट्र), आयआयटी कानपूर, (उत्तर प्रदेश), आयआयटी मद्रास, (तामिळनाडू), आयआयटी दिल्ली, (दिल्ली), आयआयटी गुवाहाटी, (आसाम), आयआयटी रूडकी, (उत्तराखंड), आयआयटी (हिंदू बनारस युनिवर्सिटी), (वाराणसी),  आयआयटी भुवनेश्वर, (ओडिसा), आयआयटी गांधीनगर, (गुजरात), आयआयटी हैदराबाद, (तेलंगाणा), आयआयटी जोधपूर, (राजस्थान), आयआयटी पटणा, (बिहार), आयआयटी रोपड, (पंजाब), आयआयटी इंदौर, (मध्यप्रदेश), आयआयटी मंडी, (हिमाचल प्रदेश), आयआयटी पलक्कड, (केरळ), आयआयटी तिरूपती, (आंध्रप्रदेश), आयआयटी धनबाद, (झारखंड), आयआयटी भिलाई, (छत्तीसगढ), आयआयटी गोवा, (गोवा), आयआयटी जम्मू, (जम्मू काश्मिर), आयआयटी धरवाड, (कर्नाटक),

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news