कचरावेचकांच्या मुलांची यशाला गवसणी; आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू | पुढारी

कचरावेचकांच्या मुलांची यशाला गवसणी; आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवसभर कष्ट करून आयुष्य जगणार्‍या आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी त्यांनी मेहनत केली अन् आज त्यांनी यशाला गवसणी घातली. ही यशाची कहाणी आहे कचरावेचकांच्या मुलांची… कोणी कंपनीत नोकरी करून तर कोणी आई-वडिलांसोबत कचरा वेचून कष्ट करून अभ्यास केला अन् त्याचे फळ म्हणून या तरुण-तरुणींनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवित आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीमधील कचरावेचकांच्या मुलांनी यश मिळवले आहे.

मुलांच्या या यशाने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पंचायतीमधील कचरावेचकांच्या मुलांनी यंदाही बारावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यात प्रज्वला ओहोळ (वाणिज्य) हिने 77 टक्के, दिशा बचुटे (वाणिज्य) हिने 75.33 टक्के, बालाजी शिंदे (कला) याने 69.33 टक्के, काजल घोडे (वाणिज्य) हिने 68.00 टक्के, कोमल म्हेत्रे (वाणिज्य) हिने 67.05 टक्के, समाधान म्हेत्रे (वाणिज्य) याने 65.33 टक्के आणि सोनाली भेंडे (वाणिज्य) हिने 40.83 टक्के गुण मिळविले. कचरा उचलून, गाड्या धुऊन, केर काढून, धुणीभांडी करून या विद्यार्थ्यांनी यशाचे यश मिळविले आहे. मोलमजुरी करणार्‍या आई-वडिलांच्या या मुलांनी त्यांच्या कष्टाला खर्‍या अर्थाने अभ्यास करून, मेहनत करून अर्थ दिला आहे.

माझ्या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे सांगत प्रज्वला ओहोळ म्हणाली, ’मला बारावी उत्तीर्ण झाल्याचा खूप आनंद आहे. कारण त्यासाठी खूप मेहनत केली आणि अभ्यास केला. आई कचरा वेचण्याचे काम करते, तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे दृष्टीने मी पहिले पाऊल टाकले आहे. मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे. आपण कष्ट केल्यास संधीचे सोने होते, हे मला नेहमीच वाटते. त्याच दृष्टीने मी अभ्यास केला आणि यश मिळविले.’

भेंडे म्हणाली, ‘माझ्या वडिलांचे निधन झाले असून, माझी आई एका सोसायटीत साफसफाईचे काम करते. आईच्या पाठिंब्यामुळे मला यशाचे शिखर गाठता आले. आयुष्यातल्या संघर्षातही मेहनत कशी करायची हे तिच्याकडून शिकले. आता बारावीनंतर पुढील शिक्षण घेणार आहे.’

शिंदे म्हणाला, ‘माझे वडील सुरक्षारक्षकाचे काम करतात आणि आई महिला वसतिगृहात साफसफाईचे काम करते. मी शिकावे हे त्यांचे स्वप्न आहे, त्यांचे आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत केली आणि त्याचे चीज झाले. माझ्या आईला पोलिस व्हायचे होते, पोलिस विभागात भरती होऊन मला तिचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी मेहनत करत आहे, पुढेही करणार आहे.’

Back to top button