एका चेहर्‍यावर अनेक चेहरे…अमृतपाल सिंगचे फोटो पोलिसांकडून जारी

एका चेहर्‍यावर अनेक चेहरे…अमृतपाल सिंगचे फोटो पोलिसांकडून जारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तान समर्थक आणि 'वारस पंजाब डे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याचा पंजाब पोलीस मागील काही दिवस शोध घेत आहे. त्‍याला फरारही घोषित करण्‍यात आले आहे. तो वेषांतर करुन पोलिसांना चकवा देत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍यांचे सात वेगवेगळे लूक असणारे फोटो जारी केले आहेत, अशी माहिती पंजाब पोलिसांच्‍या सूत्रांनी दिली.

अमृतपाल हा पंजाबमधून पसार झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) देशातील सर्व राज्‍यांमधील पोलिसांना हे फोटो शेअर केले आहेत. विमानतळ, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांना सर्व छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत.

यासंदर्भात अतिरिक्‍त पोलीस महासंचालक सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, "अमृतपाल पंजाबमधून अन्‍य राज्‍यांमध्‍ये पळून जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आम्‍ही सर्वच राज्‍यांमध्‍ये संपर्क साधला आहे. त्याच्या विरोधात लूक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहेआम्‍हाला अन्‍य राज्‍यांच्‍या पोलीस दलाचे चांगले सहकार्य मिळत आहे." अमृतपाल सिंगला अटक करण्‍यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केला.

हरियाणा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अलर्ट

अमृतपाल सिंग हा पंजाब जवळील राज्‍यांमध्‍ये लपला असावा, असा संशय पंजाब पेलिसांना आहे. चंदीगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश पोलिसांना अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. पंजाब पोलिस शेजारील राज्यांच्या पोलिसांच्या सतत संपर्कात असून, अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांची प्रत्येक माहिती शेअर केली जात आहे, असेही सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले.

पाकिस्तान आणि नेपाळ सीमेवरही सतर्कता

अमृतपालही पाकिस्तानात पळून जाण्याचाही संशय व्‍यक्‍त केला जात आहे. केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाला ( बीएसएफ) सतर्क केले आहे. पंजाबला लागून असलेल्या ५५० किलोमीटर लांबीच्या पाकिस्तान सीमेवर 'बीएसएफ'च्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान सज्ज आहेत. गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या सर्व तुकड्या आणि सशस्त्र सीमा बल यांना अमृतपालच्या छायाचित्रांसह एक संदेश पाठवण्यात आला आहे. यासोबतच सीमेवरील चौक्यांवर तैनात असलेल्या सर्व जवानांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय ग्रामीण दक्षता समित्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news