पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात खून प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जासाठी दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी ChatGPT वापर करण्यात आला. न्यायमूर्ती अनुप चितकारा यांनी आपल्या निर्णयावेळी 'चॅटजीपीटी'ने दिलेल्या माहितीचाही उल्लेख केला. जगभरातील न्यायालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) चॅटजीपीटीचा वापर हा कायद्यातील माहितीचे विश्लेषण करण्यासाठी केला जात आहे. (High Court used ChatGPT ) देशातील उच्च न्यायालयात प्रथमच याचा वापर केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जून २०२० मध्ये झालेल्या खूनातील आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती चितकार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी ChatGPTचा आधार घेतला. त्यांनी चॅटजीपीटीला प्रश्न विचारला की, या प्रकरणी संशयित आरोपीला जामीन देण्याबाबत न्यायशास्त्र काय सांगते? या वर चॅटजीपीटीने उत्तर दिले की, हा गुन्हा क्रूरतेचा समावेश असलेले एक हिंसक कृत्य आहे. खून, प्राणघातक हल्ला, शारीरिक छळ किंवा समूहासाठी घातक कृत्य अशा प्रकरणांमधील आरोपींना जामीन देण्यास न्यायमूर्ती कमी अनुकूल असतात. सार्वजनिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकरणांमधील आरोपींना जामीन देण्यासाठी मोठी रक्कम निर्धारित करु शकते.
यानंतर न्यायमूर्ती चितकारा यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, "जामिनासाठी अर्ज केलेला संशयित आरोपी व त्याच्या साथीदारांनी अत्यंत क्रूरतेने प्राणघातक हल्ला केला आहे. एखाद्यावर प्राणघातक हल्ला करुन त्याला जीव मारणे ही क्रूरता आहे. जेव्हा अशा पद्धतीने गुन्हा होतो तेव्हा संशयित आरोपीला जामीन मंजूर करण्याचे मापदंड देखील बदलतात, त्यामुळे या प्रकरणातील आरोपी जामिनाच्या सवलतीस पात्र नाही."
हेही वाचा :