शिवसेनेकडून पुण्याला मिळणार आमदार !

शिवसेनेकडून पुण्याला मिळणार आमदार !
Published on
Updated on

पुणे : शहर आणि जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या शिवसेनेकडून आता विधान परिषदेच्या माध्यमातून पुण्याला प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. लवकरच विधान परिषदेच्या माध्यमातून बारा जणांना आमदारपदाची संधी मिळणार आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट यांच्यातून ही सदस्य निवड होणार असल्याचे स्पष्ट आहे.

त्यात शिवसेनेच्या गोटातून शहराला संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहर आणि जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून या पध्दतीची व्यूहरचना केली जाऊ शकते. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील ओळखले जाणारे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

दोन दिवसांपासून भानगिरे मुंबईत…
शिंदे यांना शहरातून पाठिंबा देणारे भानगिरे पहिले नगरसेवक होते. त्यांनीच शहरात पक्ष कार्यालयासह पक्ष संघटन उभे करण्याचे काम केले आहे. सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे भानगिरे यांना आणखी ताकद पक्षातून दिली जाऊ शकते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून भानगिरे मुंबईत तळ ठोकून असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, भानगिरे यांच्याबरोबरच जिल्ह्यातून माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news