पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठा मेगा फॅशन इव्हेंट मेट गाला (Met Gala) ६ मे पासून सुरू झाला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये मेट गालाचे आयोजन करण्यात आले आहे. या फॅशन इव्हेंटमध्ये भारतासह जगभरातील मोठे सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यावेळी मेट गाला २०२४ ची थीम 'द गार्डन ऑफ टाइम : ॲन ऑड टू आर्ट अँड इटरनिटी' अशी आहे.
दरम्यान, 'मेट गाला' इव्हेंट ठिकाणाच्या बाहेर पॅलेस्टिनी समर्थकांनी जोरदार निर्दशने केली. "गाझामध्ये बॉम्ब हल्ले सुरु असताना मेट गाला नको" अशा आशयाचे बॅनर निर्दशकांनी झळकवले. तसेच पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांनी स्मोक बॉम्बने मेट गाला इव्हेंट विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी इव्हेंट मार्गावरील अतिरिक्त बॅरिकेड्स हटवले. यामुळे अनेकांना अटक करण्यात आली.
गाझामधील इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सोमवारी रात्री निदर्शने करण्यात आली. एप्रिलच्या मध्यापासून आतापर्यंत २,४०० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क शहर पोलीस विभागाने (NYPD) या कारवाईबाबत पुष्टी केली आहे. पण सोमवारी रात्री नेमके किती लोकांना ताब्यात घेण्यात आले? याचा उल्लेख केलेला नाही.
एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, हे निदर्शक न्यूयॉर्क शहरातील पब्लिक विद्यापीठाच्या हंटर कॉलेजचे असल्याचे दिसून आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, काल संध्याकाळी सेंट्रल पार्कमध्ये आंदोलकांचा एक गट "मुक्तीशिवाय कोणताही उत्सव साजरा होणार नाही" असे बॅनर घेऊन रस्त्यावर उतरला होता. याचदरम्यान, आंदोलकांचा एक मोठा गट शहराच्या पाचव्या मार्गाने मार्गस्थ झाला. त्यांच्यापैकी अनेकांनी हातात पॅलेस्टिनी झेंडे घेतले होते. ते "गाझा! गाझा!" अशा घोषणा देत होते.
न्यूयॉर्क पोलिसांनी मेट गाला इव्हेंटच्या आजूबाजूच्या विविध भागात बॅरिकेड्स लावले आहेत. सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास मेटा गालामध्ये सेलिब्रिटी येण्यास सुरुवात झाली तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना अटक करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा :