पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची नक्कल (PM Modi mimicry) केली. 'नमस्कार कोल्हापूरकर' म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना टोमणा मारला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ पवार बुधवार पासून कोल्हापुरात आहेत. आज (दि.०२) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा झाली. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या सभेला संबोधीत करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात 'नमस्कार कोल्हापुरकर' अशी केली होती. भाषणादरम्यान संपूर्ण जगात कोल्हापूरची ओळख ही 'जगात भारी कोल्हापुरी' अशी घोषणा त्यांनी दोनवेळा दिली होती. हाच धागा पकडत आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मोदी यांच्या भाषणाच्या सुरूवातीची नक्कल (PM Modi mimicry) केली.
देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांनी राज्यांत जाऊन राज्यांच्या उभारणीबाबत, विकासाबाबत मते मांडली. परंतु, सध्याचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. त्यामुळे कितीही वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर हा महाराष्ट्र संधी मिळाल्यानंतर त्यांना आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी कोल्हापुरात केला.
हेही वाचा :