राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांची बाजू आणखी मजबूत; झारखंड मुक्ती मोर्चापाठोपाठ राजभर यांच्या पक्षाचाही पाठिंबा

Draupadi Murmu
Draupadi Murmu

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विरोधी गोटातील अनेक पक्षांनी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीतील मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पाठोपाठ उत्तर प्रदेशातील ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीनेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

झारखंडमध्ये जेएमएम आणि काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असूनही जेएमएम नेते व मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या सोबत युतीत असलेल्या ओ. पी. राजभर यांच्या पक्षाने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून मुर्मू यांचे नाव जाहीर होताच कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसने मुर्मू यांच्या बाजुने मतदान करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे मुर्मू यांनी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी या दोन पक्षांचे प्रतिनिधी देखील हजर होते.

मुर्मू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत त्यांना शिवसेना, अकाली दल, तेलगू देसम पार्टी, बसपा, निजद आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांना पाठिंबा दिला जात असल्याचे वरील पक्षांकडून सांगितले जात आहे. मुर्मू यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांची बाजू मात्र कमकुवत बनली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत कोणत्या बाजुने मतदान करायचे, यावरुन कॉंग्रेस, सपा मध्ये फूट पडलेली आहे तर तृणमूल काँग्रेसदेखील सध्या कोड्यात पडली आहे.

सात विरोधी पक्षांचा पाठिंबा प्राप्त झाल्याने मुर्मू यांना पडणाऱ्या संभाव्य मतांची संख्या साडेसहा लाखांच्या समीप पोहोचली आहे. विशेष म्हणजे निवडणूक लागण्यापूर्वी रालोआकडे असलेल्या मतांची संख्या 5 लाख 26 हजार 420 इतकी होती. मुर्मू यांना विजयासाठी त्यावेळी 13 हजार मते कमी पडत होती. तथापि विरोधी पक्षांत पडलेल्या फुटीमुळे मुर्मू यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांचे समर्थन मिळाले असले तरी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याइतपत मते मिळण्याची शक्यता कमी आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत कोविंद यांना तब्बल 7.2 लाख मते पडली होती.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news