मिरज पोलिसांनी उधळला दरोड्याचा मनसुबा; सराईतांच्या आवळल्या मुसक्या

मिरज पोलिसांनी उधळला दरोड्याचा मनसुबा; सराईतांच्या आवळल्या मुसक्या

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेत दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच दरोडेखोरांचा डाव फसला असून त्यांचा दरोड्याचा मनसुबाच मिरज पोलिसांनी उधळला. गुन्हाच्या तयारी असणाऱ्या सराईतांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी कटावणी, सळी, हातोडा, मिरची पूड इत्यादी दरोड्यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीशैल राम राजमाने (वय 30, रा. हुळ्ळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज), अंनिस अल्ताफ सौदागर (वय 25, रा. दुर्गानगर, कुपवाड रस्ता, मिरज), हनिफ रज्जाक शेख (वय 24), रियाज उर्फ मिर्गी बडेसाहेब शेख (वय 40, दोघे रा. म्हाडा कॉलनी, म्हैसाळ रस्ता, मिरज) व एक अल्पवयीन अशा पाच जणांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी उपनिरीक्षक कुमार पाटील यांना दरोड्याच्या तयारी असणारे पाच जण रेल्वे स्थानक रस्त्यावरील रेल्वे पोलिस लाईनजवळ खोक्याच्या पाठीमागे लपून बसले असल्याची माहिती मिळाली.

उपनिरीक्षक पाटील यांनी तातडीने सहाय्यक निरीक्षक रवीराज फडणीस यांना याबाबत माहिती दिली. कारवाईचे आदेश मिळताच उपनिरीक्षक पाटील यांनी सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष पाटील, उदय कुलकर्णी व अन्य पोलिस पथकासह पाच जणांवर छापा टाकला. त्यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, मिरची पूड, लोखंडी सळी, हातोडा आणि दोन मोटारसायक आढळून आली. पोलिसांनी 30 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news