पुढारी ऑनलाईन डेस्क : पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ (Nepal Plane Crash) येथे रविवारी (दि. १५) एका प्रवासी विमानाचा अपघात झाला. या अपघातानंतर आता हे विमानतळ चर्चेत आले आहे. या दुर्घटनेमध्ये जवळपास ६८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यती एअरलाइन्सचे ATR-72 हे विमान पोखरा विमानतळावर पोहचण्यापासून फक्त १० सेकंद दूर होते. विमानतळावर पोहोचण्याआधी अवघ्या काही सेकंदात झालेल्या या दुर्घटनेतील पोखरा विमानतळाबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे आता या विमानतळाबाबतच्या अनेक चर्चांना उधाण आलेले आहे.
पोखरा विमानतळाबाबत विशेष माहिती अशी आहे की, या विमानतळाचा उद्घाटन सोहळा १४ दिवसांपूर्वीच पार पडलेला होता. १ जानेवरी २०२३ पासून विमानसेवेसाठी सुरु झालेल्या या विमानतळानजीक (Nepal Plane Crash) झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे सावट पसरलेले आहे. ७२ प्रवासी या विमानातून प्रवास करीत होते. यामध्ये काही भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनने या विमानतळाच्या निर्मितीसाठी मदत केलेली होती. चीनच्या एक्झिम बँकेने पोखरा विमानतळाच्या निर्मितीसाठी नेपाळला कर्ज दिलेले होते. त्यानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्धाटन करण्यात आले. या माहितीमुळे आता पोखरा या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जोरदार चर्चा सुरु आहे.
पोखरा विमानतळ प्राधिकरणाकडून असे सांगण्यात आले आहे की, यती एअरलाइन्सचे विमान धावपट्टीपासून अवघ्या 10 सेकंदाच्या अंतरावर होते, तेव्हा हे विमान कोसळले. एका एटीसी कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोखराचा रनवे पूर्व-पश्चिम दिशेला होता. विमानाच्या वैमानिकाने पूर्वेकडून उतरण्याची परवानगी मागितली व ही परवानगी मिळाली सुद्धा. मात्र वैमानिकाने पुन्हा पश्चिमेकडून उतरण्याची परवानगी मागितली व पुन्हा तशी परवानगी देण्यात आली. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे या दुर्घटनेबाबत असे म्हणणे आहे की, लँडिंगच्या आधी विमानात आग लागल्याचे दिसत होते, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.
हेही वाचा