पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.१९) पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधला. गाझा येथील रुग्णालयात मृत्यू झालेल्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांबद्दल पीएम मोदींनी शोक व्यक्त केला. या प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि ढासळत चाललेल्या सुरक्षेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. आम्ही पॅलस्टाईनमधील लोकांसाठी मदत पाठवत राहू, असेही मोदी या वेळी बोलताना म्हणाले. (PM Modi speaks on War)
गाझावर सत्ता गाजवणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला. यामध्ये इस्रायलमधील १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर २०० नागरिकांचे अपहरण करण्यात आले. यानंतर इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाझामधील हमासच्या पायाभूत सुविधांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. (PM Modi speaks on War)
इस्रायलने गाझा येथील हॉस्पिटलवर देखील हल्ला केल्याचा दावा पॅलेस्टाईनकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलने हॉस्पीटलवर हल्ला केल्याचे नाकारले आहे. गाझामधील अतिरेकी संघटनेने डागलेल्या चुकीच्या रॉकेटचा फटका बसला आहे, असे इस्रायलने म्हटले आहे. (PM Modi speaks on War)