२०२४ मध्येही देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत; महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल                

२०२४ मध्येही देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत; महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल                

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोरोनामध्ये झाले नाहीत इतके  मृत्यू तीन इंजिनचे सरकार असूनही रुग्णालयात दुरवस्थेने होत आहेत. दोन पक्ष फोडले पण तुमच्या नशिबात मुख्यमंत्रीपद नव्हते.2024 मध्येही तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत, भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही हाच महाप्रबोधन यात्रेचा संकल्प आहे असे प्रतिपादन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

वसंतराव देशपांडे सभागृहात महाप्रबोधन पर्व दोन  उद्घाटनप्रसंगीं त्या बोलत होत्या. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना ईडी,सीबीआय चौकशीत अडकवले जाते. हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा,आपली  ताकद दाखवा रडीचा डाव खेळू नका, हसन मुश्रीफ यांना क्लीनचीट दिली जाते तर दुसरीकडे रोहित पवार यांना नोटीस बजावली जाते हे कसले आलेय राजकारण? असा सवाल त्यांनी केला सरकार  पाडण्यावर तुमचा भर आहे हे कसले चाणक्य ?असा सवाल त्यांनी केला. सरकार अस्थिर झाल्यामुळे उद्योजक बाहेर गेले. रोजगार मिळाला नाही,कधीकाळी विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे म्हणणारे फडणवीस आज विदर्भ विसरले आहेत. 70000 कोटींचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांच्याशी 72 तासात आ गले लग जा… केले. कंत्राटी कामगारांनी अतिशय उत्तम काम केले मात्र त्यांना कायम करण्यात तुमची कुठली अडचण आहे यावर त्यांनी भर दिला.

महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नांची चर्चा महाप्रबोधन यात्रा पर्व दोन मधून घडवून आणली जाणार आहे. आदित्योदय उद्या नक्की होणार आहे. एकीकडे मोदी म्हणतात मी पवार यांचे मार्गदर्शन घेतो. शरद पवार असो की बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक नेते घडवले.मात्र फडणवीस यांनी कोणाला घडविले, याचे उत्तर द्यावे असे आव्हान दिले. आज भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा असे समीकरण झाल्याचे चित्र आहे. केवळ इतरांचे चरित्रहनन करून आपल्या माणसाला वलयांकित करण्यावर संघी लोकांचा भर आहे. दुसरीकडे प्रबोधनातून परिवर्तन हा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना कधीही संपणार नाही असे त्यांनी बजावले. आम्ही कुटणीती, कपट कारस्थान करणारे नाही तर निधड्या छातीने वार करणारे आणि वार झेलणारे शिवसैनिक आहोत. नागपूरच्या स्मार्ट सिटीचा मध्यंतरीच्या  अतिवृष्टीने पुरता बोजवारा उडाला असा आरोप केला.

यावेळी विदर्भ समन्वयक सुरेश साखरे, आ दूषयन्त चतुर्वेदी, प्रमोद मानमोडे, सतीश हरडे, नितीन तिवारी, शिल्पा बोडखे, मंगला गवरे, दीपक कापसे,किशोर कुमेरिया, विशाल बरबटे आणि इतर अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news