PM Modi Nashik Visit : पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.१२) राेड शो आयोजित करण्यात आला आहे. दीड किलोमीटरच्या रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा नाशिक ढोल, आदिवासी नृत्यासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन अवघ्या देशाला घडविले जाणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणांची जय्यत तयारी सुरु असल्याची माहीती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी क्रीडा आयुक्त डॉ सुहास दिवसे उपस्थित होते. (PM Modi Nashik Visit)
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाकरिता पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये (PM Modi Nashik Visit) येत आहेत. तपोवन मैदानावर होणाऱ्या महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दुपारी १ वाजता पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळी आगमन हाेणार आहे. तत्पूर्वी नीलगिरी बाग हेलिपॅड ते तपोवन मैदान असा दीड किलोमीटर रोड शो मोदी करणार आहेत. साधारणत: २० मिनिटांच्या रोड शोत रस्त्याच्या दुतर्फा नाशिककर मोदी यांचे स्वागत करतील. रस्त्याच्या दुतर्फा नाशिक ढोल वादन, आदिवासी नृत्य तसेच विविध स्थानिक कलाकार हे त्यांची कला सादर करतील, अशी माहीती विभागीय आयुक्त गमे यांनी दिली आहे.
नीलगिरी बागेत हेलिपॅड
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात पंचवटीमधील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे हेलिपॅड प्रस्तावित होते. हे हेलिपॅड ते तपोवन मैदान असा रोड शो प्रस्तावित होता. परंतु, यंत्रणांनी तेथील हेलिपॅडवर फुली मारल्यानंतर नीलगिरी बागेत हेलिपॅडची जागा निश्चित करण्यात आली. या दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव प्रथमत: सुरक्षा यंत्रणांनी रोड शाेला परवानगी नाकारली. परंतु राज्य स्तरावरून पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधत राेड शोसाठी आग्रह धरण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस रोड शोला पीएमओने हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात परवानगी मिळालेला रोड शो भव्यदिव्य करण्यासाठी यंत्रणांची आता धावपळ उडाली आहे. (PM Modi Nashik Visit)
महायुवा एक्स्पो संकल्पना
यंदाच्या युवा महोत्सवात महायुवा एक्स्पो ही नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये कला संस्कृती, खाद्य संस्कृती, नृत्य संस्कृती यांचा समावेश असणार आहे. नृत्य (कालिदास कलामंदिर), छायाचित्र, वक्तृत्व (महात्मा फुले सभागृहात), समूह नृत्य रावसाहेब थोरात सभागृहात, उदोजी महाराज सभागृह येथे लेखी स्पर्धा तर महायुवाग्राम (हनुमाननगर) येथे उर्वरित कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम नाशिककरांसाठी खुले असणार आहे.
हेही वाचा :