सातारा : सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रथपूजन | पुढारी

सातारा : सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रथपूजन

खटाव; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील सिद्धहस्त योगी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त रथपूजन सोहळा आज बुधवारी सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. ही माहिती मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांनी दिली.

रथोत्सव सोहळ्यास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधिक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

पहाटे श्री सेवागिरी मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधी, पूजा हे कार्यक्रम मठाधिपती, पुजारी व विश्वस्त यांच्या हस्ते पार पडतील. त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे पूजन करुन त्यांची रथात स्थापना करण्यात येईल. मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर सकाळी 10 वा. रथयात्रेस सुरुवात होईल. रथोत्सवादिवशी देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. श्री सेवागिरी मंदिर, सांस्कृतीक भवन व स्वागत कमानीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टकडून रथोत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

Back to top button