तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था : सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्या केरळच्या एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी केरळमधील हजारो नागरिकांनी पुढाकार घेत मोबदल्याची तब्बल ३४ कोटी रुपयांची रक्कम गोळा करण्यात यश मिळवले. ही रक्कम जमा करून आता त्या व्यक्तीची सुटका होणार आहे.
केरळचा अब्दुल रहिम सौदीमध्ये एका अरब कुटुंबातील एका गतिमंद मुलाची देखभाल करत होता. २००६ मध्ये अनवधानाने त्या मुलाकडे लक्ष देता न आल्याने तो वरच्या मजल्यावरून पडून मरण पावला. या प्रकरणात रहिमला अटक करण्यात आली व त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवत त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सौदीच्या कायद्यानुसार खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने निर्णय घेतल्यास काही मोबदला देऊन शिक्षा माफ करता येते. या प्रकरणात रहिमने ३४ कोटी रुपये जमा केल्यास त्याची सुटका होईल, असे न्यायालयाने सांगितले. मात्र त्यासाठी अत्यंत कमी मुदत देण्यात आली होती. पण इकडे भारतात रहिमच्या आईने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याला यशही आले. केरळमधील अब्जाधीशांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी सढळ हाताने मदत करीत मुदतीच्या आत ३४ कोटी रुपये उभे केले. एका मॉलच्या मालकानेही त्यात मोठी भर घातली तसेच रहिम परतल्यावर त्याला नोकरी देण्याचेही वचन दिले.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी या बाबत एक पोस्ट करीत ही माहिती समोर आणली. विजयन म्हणाले की, केरळची माध्यमांत सातत्याने बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असताना ही खरी केरळ स्टोरी जगासमोर यायला हवी.
हेही वाचा :