Asia Cup 2023 : हायब्रीड मॉडेलवर खेळवला जाणार आशिया कप! पाकचे BCCI पुढे लोटांगण

Asia Cup 2023 : हायब्रीड मॉडेलवर खेळवला जाणार आशिया कप! पाकचे BCCI पुढे लोटांगण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2023 : आशिया कप 2023 ची तयारी आता पुढे सरकत आहे. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, मात्र ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की अन्य कुठे हे अद्याप ठरलेले नाही. टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानात जाणार नाहीत हे यापूर्वीच बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीसीबीच्या अडचणी वाढवल्या आहेत.

भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला झटका बसला आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषकाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसला तरी आशिया कप हा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केला जाईल असे पाकिस्तान गृहीत धरत आहे. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कुठे होणार आणि कोणते संघ कोणत्या गटात असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तानने तयार केले हायब्रीड मॉडेल (Asia Cup 2023)

यावर्षी वनडे फॉर्मेटमध्ये होणार्‍या आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही, परंतु यंदाची स्पर्धा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, जिओ न्यूजच्या हवाल्याने वृत्त समोर आले आहे की पीसीबीचा विश्वास आहे की आशिया कप दोन टप्प्यात खेळवला जाईल, तसेच दोन्ही ठिकाणांना अंतिम स्वरूप देण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

अहवालानुसार, पहिल्या टप्प्यातील सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील, त्यानंतर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळवण्याची योजना तयार करण्यात आली आली आहे. शारजाह आणि अबुधाबीपेक्षा दुबईत सामने होणे अधिक फायदेशीर ठरेल, असे पीसीबीला वाटते.

बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर, पीसीबी तेव्हापासून हायब्रीड मॉडेलची तयारी करत आहे. परंतु बीसीसीआयने त्या नियोजनात स्वारस्य दाखवलेले नसून कसलीच प्रतिक्रिया देणे टाळले आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामने पाकिस्तानमध्ये खेळले जावेत. तर टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाण असलेल्या आणि टीम इंडिया खेळण्यासाठी तयार असलेल्या ठिकाणी व्हावेत, असे पीसीबीला वाटते.

ACC च्या बैठकीत घेतला जाणार आशिया कप 2023 बाबत अंतिम निर्णय

दरम्यान, टीम इंडियाचे आशिया कपचे (Asia Cup 2023) सामनेही श्रीलंकेत होणार असल्याची चर्चा होती, मात्र याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तानचा मुद्दा मान्य केला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना दुबईत खेळला जाऊ शकतो.

दुसरीकडे, जर स्पर्धेतील गटांबाबत चर्चा करायची झाल्यास भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असण्याची शक्यता आहे. या गटातील तिसरा संघ नेपाळचा असू शकतो. दुसऱ्या गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा सहभाग असेल असा अंदाज आहे. गटातील सर्व संघ आपापसात एक सामना खेळतील आणि त्यानंतर दोन्ही गटातील दोन संघांमध्ये म्हणजेच एकूण चार संघांमध्ये सुपर फोर फेरीचे सामने होतील. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदा नव्हे तर दोनदा एकमेकांशी लढताना दिसतील. लवकरच एसीसीची बैठक होईल असे समजते आहे, तरी त्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे प्रमुख नजम सेठीही उपस्थित राहण्याची शक्यता असून या बैठकीनंतरच आशिया कप स्पर्धेच्या ठिकाणांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी सूत्रांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news