तालुका क्रीडा संकुल सुस्थितीसाठी विशेष लक्ष द्या : अजित पवारांच्या सुचना

तालुका क्रीडा संकुल सुस्थितीसाठी विशेष लक्ष द्या : अजित पवारांच्या सुचना
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तालुका क्रीडा संकुल सुस्थितीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष द्यावेत, अशा सुचना उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे बांधण्यात येणार्‍या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन व म्युझियम इमारतीचे भुमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सहसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
पवार म्हणाले, ऑलिम्पिकच्या दृष्टीने 12 खेळांवर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्यात येते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 72 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची 61 कार्यालये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय, क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहेत. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळेल. या इमारतीचे काम लवकरात लवकर होण्यासाठी क्रीडा विभाग आणि असोसिएशन यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
ऑलिम्पिक भवनच्या भुमिपुजन करण्यास तब्बल 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागला आहे. यापुर्वी असणार्‍या सर्वच क्रीडामंत्र्यांनी करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव पदेही यापुर्वीही अनेकांनी अनुभवली. पण त्याला मुहुर्त मिळाला नाही. मात्र सात महिन्यापुर्वी राष्ट्रवादीकडे हे खाते आल्यानंतर त्वरीत हा निर्णय घेऊन आज भुमिपुजन केले आहे. आगामी एक वर्षात ही इमारत उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

कुस्तीतील वाद मिटविणार

राज्यातील कुस्ती संघटनेमध्ये वाद निर्माण झाला असून तो दिल्लीपर्यंत गेलेला आहे. वास्तविक संघटनांमध्ये अथवा खेळामध्ये वाद नसावेत. खेळाडू आणि स्पर्धा निकोप व्हावेत यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. यासर्वाचा विचार करुन कुस्तीतील वाद मिटविण्यात नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news