छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामागे समर्थ रामदास : योगी आदित्यनाथ | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामागे समर्थ रामदास : योगी आदित्यनाथ

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : भक्ती आणि शक्तीचा संगम या महाराष्ट्रात झाला म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे समर्थ रामदास घडवू शकले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य तर उभे केले, औरंगजेबाला याच महाराष्ट्रात तडफडत मरण्याची वेळ त्यांच्या पराक्रमामुळे आली असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी गीताभक्ती महोत्सवात व्यक्त केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त आळंदीत गीताभक्ती अमृतमहोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ यांनी समर्थ रामदासांच्या कार्याचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव म्हणून उत्तरप्रदेश सरकारने मोगल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांच्या विचारातुन उत्तरप्रदेश सरकारने सुरक्षा कॅरिडॉर उभारल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर पीठाधीश शंकराचार्य महाराज, गोविंददेव गिरी महाराज, उत्तरप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंग, रामदेव बाबा, आदेशानंद महाराज, राजेंद्रदास महाराज, काळसिद्धेश्वर महाराज कणेरी मठ, शांतीब्रम्ह मारुतीबाबा कुऱ्हेकर, चिदानंद सरस्वती महाराज, बाळकृष्ण महाराज, साध्वी भगवतीदेवी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, रमेशभाई ओझा, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार उमा कापरे, अजय भुतडा, राजा लुईस उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button