Pankaja Munde And Dhananjay Munde : काळाची पावले ओळखून मुंडे बहीण-भावाचे बेरजेचे राजकारण

Pankaja Munde And Dhananjay Munde : काळाची पावले ओळखून मुंडे बहीण-भावाचे बेरजेचे राजकारण

बीड; बालाजी तोंडे : भाजपनेत्या पंकजा मुंडे असोत वा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे… दोन्ही नेत्यांची आपापल्या समर्थकांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. दोन्ही नेत्यांचे त्यांच्या पक्षात राज्य आणि देशपातळीवरही महत्त्व आहे. मागील नऊ वर्षांत दोन्ही नेत्यांमधील वाद, टीका-टिप्पणी सार्‍या महाराष्ट्राने पाहिली. मात्र, प्राप्त परिस्थिती आणि काळाची पावले ओळखून मुुंडे बहीण-भावाने बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. याचा प्रत्यय वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आला. (Pankaja Munde And Dhananjay Munde)

दोघांनी मिळून निवडणूक बिनविरोध केली. चेअरमनपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली. लोकनेते स्व. मुंडे यांनी उभारलेल्या वैद्यनाथ कारखान्यात राजकारण नको म्हणून जरी दोघे एकत्र आलेले असले तरी राज्याच्या राजकारणात मोठी क्रेझ आणि लाखो समर्थकांचे संचित असलेल्या मुंडे बहीण-भावाचे बेरजेचे राजकारण अगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. (Pankaja Munde And Dhananjay Munde)

स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्र भाजपातील सर्वांत मोठे नेते असले तरी त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ सबंध होते. यामुळेचे बेरजेचे राजकारण करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. करंगळीला धरून राजकारणात मोठे केलेले अनेक नेते सोडून गेले तरी केवळ बेरजेच्या राजकारणामुळे स्व. मुंडे यांचे लोक आणि लोकप्रियता कायम होती. स्व. मुंडे यांच्यानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे व पुतणे धनंजय मुंडे यांच्यातील वितुष्ट वाढले. पंकजा मुंडे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची लोकप्रियता मोठी असल्यामुळे त्यांच्या साध्या-सहज वक्तव्याची देखील वादाच्या अनुषंगाने बातमी झाली. राजकारणात दोघे एकमेकांवर टीका-टिप्पणी करत असले, दोघांमध्ये टोकाचे राजकीय मतभेद असले तरी दोन्ही नेत्यांनी मनभेद होऊ दिले नाहीत. सुख- दु:खाच्या प्रसंगात बहीण भावाच्या अन् भाऊ बहिणीच्या पाठीशी असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. (Pankaja Munde And Dhananjay Munde)

अलीकडच्या काळात परिस्थिती आणि काळाची पावले ओळखून मुंडे बहीण-भावाने बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघांनी मिळून कारखाना बिनविरोध काढला. कारखान्याच्या चेअरमनपदी पंकजा मुंडे विराजमान झाल्या. या निवडीनंतर धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड आणि चुलत बंधू अजय मुंडे यांनी पंकजा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुंडे बहीण-भावाचे हे बेरजेचे राजकारण अगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. यामुळे दोन गटांत विभागलेल्या आणि मूळचे लोकनेते स्व. मुंडे यांचे समर्थक असलेल्या लोकांमधून या बेरजेच्या राजकारणाचे स्वागत होत आहे.

फुटून गेलेल्यांना दूर ठेवले

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळात मानाचे स्थान देऊनही नामदेवराव आघाव व इतर काही संचलकांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची साथ सोडली होती. त्यांना यावेळी दूर ठेवण्यात आले.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news