पन्हाळा मुख्य रस्ता वाहतुकीस खुला; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पन्हाळा मुख्य रस्ता वाहतुकीस खुला; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : पन्हाळ्याचा मुख्य रस्ता आज (दि.७) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्य रस्त्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली.

जिल्ह्यात प्रथमच अत्याधुनिक अशा जिओ ग्रेड तंत्रज्ञानाने या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. पन्हाळा पर्यटनासाठी पुन्हा एकदा या निमित्ताने सज्ज झाला आहे. पर्यटन पुन्हा विकसित व्हावे, पन्हाळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विविध विकास कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

पन्हाळगडावर १२ कोटीचा लाईट साऊंड प्रकल्प त्याचबरोबर जोतिबा – पावनगड दरम्यान रोप-वे प्रस्तावित आहे. याबाबत पर्यटन मंत्रालयात लवकरच बैठक लावून ही कामे मार्गी लावली जातील. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटनाचा नवा डीपीआर तयार केला जाईल. पर्यटन व्यवसायास एक वेगळी ओळख करून देऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थ कारणास चालना दिली जाईल. त्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, मुख्य रस्ता गेली नऊ महिने बंद होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने व ठेकेदार शिवाजी मोहिते यांनी उत्कृष्ट असे रस्त्याचे काम केले आहे. आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, मुख्य रस्ता खचण्याच्या मुख्य कारणांचा अभ्यास व्हावा. गडावरील निचरा होणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याकडील स्थापत्यशास्त्र म्हणावे तितके विकसित नाही. पूर्ण अभ्यास न करता जागोजागी सिमेंट भिंती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाणी निचरा होऊ न शकल्यामुळे रस्ता खचला. वन विभागाने २६५ मीटरच्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही आमदार कोरे यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस बी कुंभार, कार्यकारी अभियंता संजय काटकर, माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल, गोकुळ संचालक करणसिंह गायकवाड, बाबासो चौगले, केडीसीसी बँकेचे संचालक विजय माने, शिवाजी मोरे, शंकर पाटील आदी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले. नगरपालिका प्रशासक स्वरूप खारगे यांनी आभार मानले.

पन्हाळा मुख्य रस्ता आजपासून वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून पन्हाळ्यावर आनंदाचे वातावरण आहे. आता हा रस्ता सिमेंटचा झाल्यानंतर अवजड वाहनास खुला करण्यात यावा. एसटी बसेस लवकर सुरू व्हाव्यात, त्या दृष्टीने काम पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यात तलावांच्या भिंती देखील पडल्या आहेत. त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news