औरंगाबाद : लग्नाहून परतणाऱ्या कारचा अपघात; एक ठार | पुढारी

औरंगाबाद : लग्नाहून परतणाऱ्या कारचा अपघात; एक ठार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वालसावगी येथून लग्नसमारंभ आटोपून अमसरी, शिवना येथील तिघे जण कारने घरी परतत होते. यावेळी बुलढाणा अजिंठा मार्गावरील सिल्लोड तालुक्यातील मादनी येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघात १ जण ठार व दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.७) रात्री ९ च्या सुमारास घडली. जखमींना सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे लग्न सोहळा आटोपून सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील समाधान शंकर गायकवाड (वय ३०) हा व त्याचे शिवना येथील मामेभाऊ अजय फकिरा मोरे (वय २२), विजय फकिरा मोरे (वय २०) हे (एमएच १२ एफएफ ८६३५) या कारने येत होते. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बुलढाणा अजिंठा मार्गावरील मादनी जवळील हिंदुस्थान पेट्रोल पपंच्या निकट आल्यावर कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून शेतात शिरली व पलटी झाली. या भीषण अपघातात समाधान शंकर गायकवाड हा जागीच ठार झाला. तर त्याचे शिवना येथील मामेभाऊ अजय मोरे, विजय मोरे हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, पोलिस नाईक अनिल लोखंडे व इतर ग्रामस्थानी जखमींना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढले व तातडीने दवाखान्यात रवाना केले. मयताच्या पार्थिवावर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी सिल्लोड पाठविण्यात आले. घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड, बिटजमादार अरुण गाडेकर पुढील तपास करीत आहे.

Back to top button