पन्हाळा पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा (Panhala Fort) येथील प्रवेशद्वारावर असणाऱ्या सादोबा तळ्याच्या भिंतीचा काही भाग आज ढासळला. पन्हाळा येथील हे ऐतिहासिक असे तळे असून या तळ्याचे बांधकाम 1702 साली करण्यात आले असल्याच्या नोंदी आहेत. इब्राहिम आदिलशहाच्या काळात या तळ्याचे नाव हौजे खिजर असल्याचे नमूद आहे, या तळ्याच्या संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
सादोबा तळ्याच्यावरील भागात मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. त्याचबरोबर काही भागात लोकवस्तीदेखील आहे. गेल्या तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे तळ्याच्या मोटवण नावाच्या भिंतीचा पुढील भाग ढासळत असून ही भिंत तळ्याच्यावरील भिंतीचा आधार आहे. आधाराची ही भिंत ढासळली तर वरील भरावदेखील खाली येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात तीन वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यांची डागडुजी केलेली नाही. तसेच तलावाच्या बाजूने जाण्याच्या रस्त्यावरदेखील भिंतीना तडे गेले आहेत. याबाबत देखील पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अनेकवेळा इम्तियाज मुजावर, अमित जगताप, निलेश जगताप यांनी पदाधिकारी, अधिकारी यांना तळ्याच्या भिंती दुरुस्ती करावी अशी विनंती केली आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही असे इम्तियाज मुजावर यांनी माहिती देताना सांगितले.
राज्य शासनाने सरोवर संवर्धनासाठी पालिकाना निधी दिला होता. या निधीचे काय झाले? असा सवाल नागरिक विचारत आहेत. सादोबा तलावाच्या संरक्षक भिंती तातडीने बांधकाम न केल्यास पूर्ण तलाव दगडाने भरून जाइल अशी अवस्था झाली आहे. या ठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी जातात. भिंती ढासळत असल्याने तलावात जाणे धोक्याचे झाले आहे. ऐतिहासिक तलाव दुरुस्तीसाठी शासनाने त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचलंत का?