कराची (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन; पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली असताना आता पाकिस्तानी रुपया (Pakistan rupee) गडगडला आहे. इस्लामाबादमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी अटक (Imran Khan arrest) झाल्याच्या एका दिवसानंतर बुधवारी पाकिस्तानी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १.३ टक्के घसरून २८८.५ च्या विक्रमी निचांकी पातळीवर आला.
भारतीय रुपयाच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया (Pakistan rupee) ३.४५ वर आहे. याचाच अर्थ एक भारतीय रुपया ३.४५ पाकिस्तानी रुपयाच्या बरोबरीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमुल्यन झाले आहे. याला कारण पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळीखोरीच्या दिशेने जात आहे. येथील वाढत्या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. येथील महागाईचा दर ३६ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. प्रत्यक्षात महागाई दर या अधिकृत आकडेवारीपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात पाकिस्तानची अर्थव्यवस्था यावर्षी ०.२ टक्के दराने वाढेल असे म्हटले होते. २०२२ मध्ये अर्थव्यवस्था वाढीचा वेग ६ टक्के होता. सध्याच्या परिस्थिती पाहाता पुढील काही दिवसांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कांदे (२८८ टक्के), गॅस (१०८ टक्के), मैदा (१२० टक्के), सिगारेट (१६५ टक्के), डिझेल (१०२ टक्के), चहा (९४ टक्के), केळी (८९ टक्के), बासमती तांदूळ (८१ टक्के), पेट्रोल (८१ टक्के), अंडी (७९ टक्के) महागली आहेत. आकडेवारीनुसार, ५१ जीवनावश्यक वस्तूंपैकी २६ वस्तूंच्या किमती वाढल्या (Inflation in Pakistan) आहेत. १२ वस्तूंच्या किमतीत किंचित घट झाली असून, १३ वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा :