पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष मुस्लीम लीग-नवाझ र्थमंत्री इशाक दार यांना हंगामी पंतप्रधान बनवण्याच्या विचारात आहे. यासाठी शेहबाज शरीफ सरकार निवडणूक कायदा २०१७ मध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे इसहाक दार यांचे नाव हंगमी पंतप्रधानपदासाठी चर्चेत आल्याचे वृत्त आहे. ( Pakistan interim PM ) जाणून घेवूया या मागील कारण…
पाकिस्तानची आतंरराष्ट्रीय नाणेनिधी ( आयएमएफ) बरोबर चर्चा सुरू आहे. शेजारील देशात सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तान सरकारला देशात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी 'आयएमएफ'च्या योजनांमध्ये कोणताही अडथळा नको आहे, म्हणून निवडणूक कायद्यात बदल करून अंतरिम सरकारला आवश्यक आर्थिक धोरणे आणि उपक्रम सुरू ठेवता येतील इतके अधिकार दिले जात आहेत. यामुळेच अर्थमंत्री इशाक दार यांना हंगामी पंतप्रधान बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, सध्या सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या संमतीची आवश्यकता असणार आहे.
पाकिस्तान सरकार निवडणूक कायदा २०१७ मध्ये सुधारणा करून अंतरिम सरकारला अनेक अधिकार देण्याची तयारी करत आहे. हे दुरुस्ती विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे. हा कायदा झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अंतरिम सरकार निर्णय घेऊ शकेल. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत बिकट अवस्थेत आहे. निवडणुकांमुळे आर्थिक धोरणे तीन महिने थांबवता येणार नसल्याने पाकिस्तानवर हंगामी पंतप्रधान नियुक्त करण्याची नामुष्की ओढवली आहे.
पाकिस्तानमध्ये, अंतरिम सरकार केवळ दैनंदिन कामकाजाशी संबंधित निर्णय घेऊ शकते, परंतु निवडणूक कायद्यात बदल केल्यानंतर, अंतरिम सरकारला काही अधिकारही दिले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर अंतरिम सरकारचे निर्णय निवडून आलेले सरकार बदलू शकतात. आर्थिक बाबींमध्ये जाणकार आणि शरीफ कुटुंबाच्या जवळचे असल्याने अंतरिम पंतप्रधानपदासाठी इशाक दार यांचे नाव आघाडीवर आहे. इशाक दार यांच्याशिवाय माजी अर्थमंत्री हाफिज शेख यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा :