नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
भूतानमध्ये (Bhutan) भारताच्या सीमेजवळ असलेल्या एका डुकरांच्या फार्ममध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा (African swine fever) उद्रेक झाला असल्याची माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ (OIE- World Organisation for Animal Health) ने दिली आहे. छुखा जिल्ह्यातील सेमी-कमर्शियल एका डुकरांच्या फार्मवर स्वाइन फिव्हरचा प्रादुर्भाव झाला आहे. भूतानसह भारतामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
त्रिपुरामध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरनं संक्रमित झालेल्या १०० हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे डुकरांना मारण्याचा निर्णय त्रिपुराच्या पशु संर्वधन विभागाने घेतला आहे. मृत डुकरांची विल्हेवाट बंदिस्त ठिकाणी लावली जाणार आहे आणि जे जिवंत आहेत त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पशु संर्वधन विभागाचे मंत्री भगबान दास यांनी दिली आहे.
आफ्रिकन स्वाइन फिव्हर (ASF) हा जंगली आणि पाळीव डुकरांमध्ये एक अत्यंत वेगाने संक्रमित होणारा विषाणूजन्य रोग आहे. ज्याचा मृत्यू दर १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. हा मानवी आरोग्यासाठी धोक्याचा नाही. परंतु डुकरांच्या संख्येवर आणि शेतीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतो. हा विषाणू कपडे, बूट, चाके आणि इतर सामग्रीवर जिवंत राहू शकतो. हॅम, सॉसेज आदी डुकराच्या मांसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांवरदेखील हा विषाणू जिवंत राहू शकतो.
आफ्रिकन स्वाइन फिव्हरवर अद्याप कोणतीही प्रभावी लस उपलब्ध नाही. हा संक्रमित प्राण्यांच्या शरिरातून द्रव पदार्थांच्या माध्यमातून संपर्कात आल्यावर पसरतो. शरिरातून खाद्य मिळवणाऱ्या किटकांच्या माध्यमातूनही त्याचा फैलाव होतो. मनुष्यदेखील याच्या फैलावाचे माध्यम बनू शकतो.
African swine fever जगभरात फैलावत आहे. यामुळे डुकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या फिव्हरचा प्रादुर्भाव आशिया, कॅरेबिया, युरोप आणि प्रशांत महासागर क्षेत्रात झाला आहे. पाळीव तसेच जंगली डुकरे यामुळे बाधित होत आहेत. आफ्रिकेत १९०० च्या सुरुवातीस हा विषाणू प्रथम आढळून आला होता. आता आशिया आणि युरोपीय देशांमध्ये पसरला आहे.