नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी आमची सुरू आहे. शक्य झालं तर महाविकास आघाडी मिळून आम्ही ही निवडणूक लढू. नाहीतर एकट्याच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढू, कारण पुढे आम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळेल. कारण राष्ट्रवादीने विदर्भातून ११ आमदार निवडून दिले होते. आता पुन्हा एकदा आम्ही नव्याने तयारी करत आहे, असे राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आणि नागपूरचे प्रभारी दिलीप वळसे- पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सांगितले.
प्रभारी म्हणून नागपूरच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता रवी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी वळसे- पाटील (Dilip Walse-Patil) म्हणाले की, विदर्भात आणि विशेष करून नागपूर शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल. राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी परिस्थिती आहे. स्थानिक पातळीवर आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली आहे. जर आघाडी झाली तर आघाडीत लढू नाहीतर स्वतंत्र लढू. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल का, असे विचारले असता, दुसऱ्यांच्या भांडणाचा फायदा घेतल्यापेक्षा आम्ही जनतेच्या समोर जाऊन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज नागपूर शहरामध्ये २०१२ साली भाजपने घोषणा केली होती की, पिण्याचे पाणी आम्ही २४ बाय ७ देऊ. पण आज नागपूर शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे.
खरं तर मला महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री व्हायचे होते, पण वरिष्ठांच्या आदेशानुसार मला अर्थमंत्रालय सांभाळावे लागले, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतच केले आहे. याबाबत विचारले असता, वळसे- पाटील म्हणाले की, वरिष्ठांनी तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, हे मला सांगता येणार नाही आणि त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.
हेही वाचलंत का ?