नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पवित्र पोर्टलद्वारे नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी सध्या कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी, अशी राज्यातील शिक्षकांची मागणी पूर्ण झाल्याने राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या माध्यमातून यश मिळाले असून ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित केल्याने राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याची मागणी पुर्णत्वास गेली आहे. नजिकच्या काळात बदल्यांचा मार्ग सुकर झाल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दीर्घकाळ पाठपुरावा करीत शिक्षक भरती प्रक्रियेला चालना दिली होती. दरम्यान, शिक्षक बदल्यांच्या धोरणाचा शासन स्तरावर फेरविचार सुरु झाल्याने शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे सरचिटणीस राजन कोरगांवकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २१ जून २०२३ रोजी शालेय शिक्षण विभागाने बदल्यांसाठी आदेश पारीत केला होता. मात्र जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांचे अधिकार ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर ग्रामविकास विभागाकडून स्वतंत्र आदेश निघावा यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर गिरीश महाजन यांच्या विभागामार्फत याविषयीचा आदेश निघाला आहे.
हेही वाचा :