OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन पीएम मोदींना भेटले, जाणून घ्या काय झाली चर्चा

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन पीएम मोदींना भेटले, जाणून घ्या काय झाली चर्चा

पुढारी ऑनलाईन : ChatGpt चे निर्माते आणि OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन (OpenAI Chief Executive Officer Sam Altman) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी जागतिक नियमनाच्या गरजेवर चर्चा केली. ऑल्टमन हे या आठवड्यात सहा देशांचा दौरा करणार आहे. भारतासह ते इस्राईल, जॉर्डन, कतार, यूएई आणि दक्षिण कोरियाला भेट देणार आहेत. आयआयआयटी दिल्लीच्या एका सत्रादरम्यान, ऑल्टमन म्हणाले की त्यांनी देशासमोरील संधी आणि भारताने AI चा अवलंब करावा याबद्दल चर्चा केली. ऑल्टमॅन यांची कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाशी संबंधित आहे आणि त्यांनी ChatGPT ची निर्मिती केली आहे.

"भारताच्या अतुलनीय तंत्रज्ञान इकोसिस्टमबद्दल आणि देशाला AI चा कसा फायदा होऊ शकतो याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उत्तम संवाद झाला. पंतप्रधान कार्यालयातील लोकांसोबतच्या सर्व बैठकींचा आनंद घेतला." असे सॅम ऑल्टमन यांनी ट्विट करत म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या बैठकीचा फोटोही ट्विट केला आहे.

"सॅम ऑल्टमन यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण संवादाबद्दल धन्यवाद. भारतातील तंत्रज्ञान इकोसिस्टम वाढवण्यासाठी AI ची क्षमता खरोखरच अफाट आहे आणि ती विशेषतः तरुणांमध्येदेखील आहे. आमच्या नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आमच्या डिजिटल परिवर्तनाला गती देणाऱ्या सर्व सहकार्यांचे आम्ही स्वागत करतो", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

देशाच्या तंत्रज्ञान  इकोसिस्टिममध्ये सुधारणा करण्याची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमतेमध्ये मोठी क्षमता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओपन एआय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान सांगितले.
देशाच्या डिजिटल क्रांतीमध्ये ओपन एआय महत्वाची कामगिरी बजावू शकते. विशेषतः युवक या माध्यमातून लाभान्वित होऊ शकतात, असे मोदी यांनी यावेळी नमूद केले.

इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सेल्फ-रेग्युलेशनवर फायरसाइड चॅट दरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात, ऑल्टमन म्हणाले की OpenAI स्वतःचे नियमन करते आणि चॅटजीपीटी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी त्यांना सुमारे आठ महिने लागले. "याची मर्यादा काय असावी हे शोधण्यासाठी आम्ही एका बाहेरील संस्थेसोबत काम केले आहे. आम्हाला वाटते की आम्ही येथे केवळ संस्थाच राहणार नाही. आम्हाला वाटते की समन्वय महत्वाचा आहे." असे ऑल्टमन यांनी म्हटले आहे.

भारतीय स्टार्टअप्सशी संलग्नतेबद्दल विचारले असता, ऑल्टमन म्हणाले की त्यांनी बुधवारी त्यांच्यापैकी काहींशी चर्चा केली आणि भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याची त्यांची इच्छा आहे.

जगभरातील अनेक लोक ऑनलाइन कंटेंट शोधण्यापासून ते विविध शैक्षणिक उद्देशांसाठी ChatGPT चा वापर करत आहेत. AI चे नियमन करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या नैतिक वापरावर मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी जगभरातून सूर व्यक्त होत आहे.

सरकारने या वर्षी फेब्रुवारीमध्ये NASSCOM डेटाचा हवाला देत म्हटले होते की भारतातील एकूण AI रोजगार अंदाजे ४,१६,००० प्रोफेशनल्स आहेत. या क्षेत्राच्या वाढीचा दर सुमारे २०-२५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. AI चे २०३५ पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत अतिरिक्त ९५७ अब्ज डॉलर योगदान राहण्याची शक्यता आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news