OpenAI CEO Sam Altman | AI जगतातील दिग्गज सॅम ऑल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, कोण आहे त्यांचा जोडीदार?

OpenAI CEO Sam Altman | AI जगतातील दिग्गज सॅम ऑल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, कोण आहे त्यांचा जोडीदार?

पुढारी ऑनलाईन : 'ओपनएआय'चे (OpenAI) सीईओ सॅम ऑल्टमन (OpenAI CEO Sam Altman) यांनी त्यांचा दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असलेला बॉयफ्रेंड ऑलिव्हर मुल्हेरिन (Oliver Mulherin) याच्याशी लग्न केले आहे. सॅम ऑल्टमन यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील या जोडप्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पण लोकांनी उपरोधिकपणे सोशल मीडियावर अंदाज लावला की हे AI-जनरेटेड फोटो आहेत. दरम्यान, ऑल्टमॅन यांनी एनबीसी न्यूजकडे याची पुष्टी केली आहे की त्यानी खरोखरोच लग्नगाठ बांधली आहे.

ऑलिव्हर मुल्हेरिन यानेही इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या वृत्ताची पुष्टी केली. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या मित्राशी मी लग्न केले आणि हे माझ्या आयुष्यातील प्रेम आहे". या पोस्टचा स्क्रीनशॉट फ्री प्रेस जर्नलने शेअर केला आहे.

X (पूर्वीचे Twitter) वर @heyBarsee या यूजरने Altman आणि Mulherin यांच्या लग्न समारंभातील फोटोदेखील शेअर केले आहेत. ऑलिव्हर मुल्हेरिनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केलेले फोटो बहुधा तसेच आहेत.

ऑलिव्हर मुल्हेरिन आहे तरी कोण?

ऑलिव्हर मुल्हेरिन कोण आहे? असा प्रश्न आता सोशल मीडियावर अनेकांना पडला आहे. विशेषत: ऑल्टमन आणि मुल्हेरिन त्यांच्या नात्याबद्दल फारसे कधी बोलले नाहीत. सप्टेंबर २०२३ मध्ये न्यूयॉर्क मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, सॅम ऑल्टमन यांनी म्हटले होते की त्यांना आणि मुल्हेरिनला लवकरच मूल व्हायला आवडेल.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आयोजित केलेल्या डिनरला सॅम ऑल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित राहिले होते.

या जोडप्याने त्यांच्या रिलेशनशीपबद्दल गुप्तता पाळली होती. लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ऑलिव्हर मुल्हेरिन हा एक ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर अभियंता आहे. त्याने ऑगस्ट २०२० ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत मेटासोबत काम केले होते.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका नाट्यमय घडामोडीत सॅम ऑल्टमन यांना OpenAI मधून काढून टाकण्यात आले होते. ऑल्टमन यांच्याबाबतच्या या निर्णयाने अनेक कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत ऑल्टमॅन यांना पुन्हा पदावर घेतले जात नाही तोपर्यंत राजीनामा देण्याचा आणि मायक्रोसॉफ्टमध्ये स्विच करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर ऑल्टमॅन यांना सीईओ पदावर पुन्हा घेण्यात आले. सर्व माजी बोर्ड सदस्यांना काढून टाकून नवीन बोर्ड स्थापन करण्यात आले होते. यामुळे ऑल्टमन चर्चेत राहिले होते.

संबंधित बातम्या 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news