लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पोलीस बंदोबस्तात पार पडले असून कांद्याला सरासरी 2150 रुपये इतका बाजारभाव मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही नाफेड शुक्रवारी (दि.25) कांदा खरेदीला न उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
निर्यात शुल्कवाढीविरोधात तीन दिवस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत दोन लाख मॅट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीची घोषणा केल्यानंतर गुरुवारी (दि.24) कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्यानंतर नाफेडचा प्रतिनिधी कांदा खरेदी करण्यासाठी नसल्याने दिवसभर कांद्याचे लिलाव बंद ठेवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याचे नाफेडला आदेश दिल्यानंतरही शुक्रवारी नाफेड कांदा खरेदीला न उतरल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव पोलीस बंदोबस्तात पार पडले.
सकाळच्या सत्रात 200 वाहनांतून आलेल्या कांद्याला जास्तीत जास्त 2400 रुपये सरासरी 2150 रुपये तर कमीत कमी 700 रुपये इतका बाजारभाव प्रतिक्विंटलला मिळाला. मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने आज मिळणारे बाजारभाव न परवडणारे असल्याने नाफेडने 3 ते 4 हजार रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी जोरदार मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा :