चंद्रपूर: अखेर अनाथ विद्यार्थिनीला मिळाला दाखला; ‘आप’च्या आंदोलनाला यश | पुढारी

चंद्रपूर: अखेर अनाथ विद्यार्थिनीला मिळाला दाखला; 'आप'च्या आंदोलनाला यश

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलमध्ये मागील शैक्षणिक सत्रातील दहावीत ८४ टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तनिष्का अनंत बलवीर हिला फी न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली होती. याविरोधात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी अर्धनग्न आंदोलन शाळेच्या परिसरात सुरू केले. आंदोलनात आपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली व आंदोलन तीव्र झाल्याने जिल्हाधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेतली. शिक्षणाधिकारी यांच्याशी घेतलेल्या बैठकीत पीडित तनिष्का अनंत बलवीर या मुलीला शाळा सोडण्याबाबत दाखला देण्याचे निर्देश दिल्याने शाळा व्यवस्थापनाने दाखला दिला आहे.

चंद्रपूर येथील चांदा पब्लिकमध्ये ही मुलगी केजी १ पासून शिकत आहे. आई व वडीलांच्या निधनानंतर ती काकाकडे आहे. शाळेने परिस्थिती बघता फी लागणार नाही आम्ही जबाबदारी घेऊ असे २०१६ मध्ये सांगितले होते. पण अचानक ती १० वी पास होताच ७० हजार रुपये शुल्क भरण्याचा हट्ट शाळा प्रशासनाने तिच्याकडे धरला होता.

अनाथ विद्यार्थिनी असूनही ७० हजार रुपये शुल्क भरण्याचा शाळेने तगादा लावला होता. धक्कादायक म्हणजे, शाळेने शुल्काबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. अशा स्थितीत तनिष्का आणि तिच्या पालनकर्ता काकांना हा आर्थिक भार ऐनवेळी सोसावा लागला असता. दुसऱ्या शाळेत पुढील प्रवेशासाठी तिला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. मुलीने हवालदील होऊन आम आदमी पार्टी कडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

याविरोधात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून शाळेत आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील केली. आम आदमी पक्षाने कठोर भूमिका घेत तनिष्काला न्याय देण्याची मागणी करीत रात्रीपर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने आपला हेका मागे घेत दाखला देण्यास तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा 

Back to top button