नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हरियाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील नागरिकांची सुमारे एक हजार कोटी रुपयांची फसवणूक करून नाशिकमध्ये नाव बदलून राहणार्या संशयित भामट्यास दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थेफ्ट युनिट (एएटीएस) पथकाने पकडले आहे. या भामट्याविरोधात फसवणूक प्रकरणी 36 गुन्हे दाखल आहेत. तो नाशिकमध्ये नाव बदलून कांदा व्यापारी म्हणून राहत होता.
पीयूष तिवारी ऊर्फ पुनीत भारद्वाज (42) असे या भामट्याचे नाव आहे. पीयूष हा दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे राहत होता. सुरुवातीला त्याने दिल्ली एनसीआरमध्ये जाहिरात एजन्सी सुरू केली आणि नंतर एजन्सी विकली. त्यानंतर त्याने नोएडामध्ये इमारती बांधण्यासाठी पैसे गुंतवले. त्यातून लोकांची फसवणूक सुरू केली होती. तिवारी याने नोएडा येथे फ्लॅट देण्याच्या बहाण्याने लोकांची सुमारे एक हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
त्याला न्यायालयाने फरारही घोषित केले. त्याची पत्नी शिखा हिचाही फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असून, ती सध्या तुरुंगात आहे. तिवारी हा फरार झाल्यानंतर दक्षिण भारतात राहिल्याचे समोर येत आहे. 2016 मध्ये त्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. यामध्ये 120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. फरार असल्याने त्यास पकडून देणार्यास 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर होते. दिल्ली पोलिसांनी तिवारीवर पाळत ठेवली. तो नाशिकमध्ये राहत असून, कांद्याचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी इंदिरानगर पोलिसांच्या मदतीने मुंबई- आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमधून त्यास पकडले.
अशी करायचा फसवणूक….
प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर पुन्हा आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी तिवारीने अनेक खरेदीदारांना फ्लॅट विकण्याचा सपाटा लावला. काही प्रकरणात एकच फ्लॅट अनेकांना विक्री केल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदारांची फसवणूक होत होती. त्याच्याविरोधात 36 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होताच ओळख बदलवून तो दक्षिण भारतात विविध धंदे करत होता.