पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त दर्शन रांगेसाठी १० शेडची उभारणी; वॉटरप्रूफ दर्शन रांग

पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त दर्शन रांगेसाठी १० शेडची उभारणी; वॉटरप्रूफ दर्शन रांग

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या ४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला ८ ते १० लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. यामुळे मंदिर समितीकडून भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग उभारण्याचे काम सुरु आहे. तर दर्शन रांगेत पत्राशेड येथे कायमस्वरुपी चार व तात्पुरते सहा असे एकूण १० दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आल्याने भाविकांना २४ तास दर्शन रांगेत उभारता येणार आहे.

कोरोनानंतर सुमारे दोन वर्षानंतर आषाढी यात्रा निर्बंधमुक्त साजरी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यात मंदिर समितीने देखील सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरु केली आहे.

श्री. विठ्ठल -रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन भाविकांना घेता यावे, म्हणून भाविकांसाठी दर्शन रांग उभारण्यात येत आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून दर्शन रांगेतील भाविकांचे संरक्षण व्हावे, म्हणून वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात येत आहे. स्कायवॉक, सारडा भवन ते पुढे पत्राशेडापर्यंत दर्शन रांग तयार झाली आहे. तर पत्राशेडमधीलही दहा दर्शन शेडची उभारणी करण्यात आलेली आहे. तर दर्शन रांग पत्राशेड येथून पुढे गोपाळपूरापर्यंत उभारण्यात येत आहे.

दर्शन रांगेत भाविकांना सेवासुविधा

दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे शुध्द पाणी, वीज, लाऊडस्पीकरवरुन श्रींचे गाणी ऐकता येणार आहे. तर प्रथमोपचार केंद्र, शौचालये, सीसीटिव्ही यासोबत पोलीस बंदोबस्तही असणार आहे. यामुळे दर्शन रांगेत होणारी चोरी, घुसखोरी रोखता येणार आहे. पाऊस आलाच तर भाविकांना चिखल व पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगेत कचखडी टाकण्यात आली आहे. तर मॅट अंथरण्यात आल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

वॉटरप्रूफ दर्शन रांग

कोरोनामुळे न भरलेली वारी यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त भरली जात आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरात येणार आहेत. या भाविकांना भरपावसातही दर्शन रांगेत उभारता यावे, म्हणून दर्शनरांग वॉटरप्रूफ बनवण्यात आली आहे. यामुळे भाविकांचे ऊन, वारा व पावसापासून बचाव होणार आहे. या रांगेत प्रथम उपचार केंद्र, भाविकांसाठी थंड पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच पत्राशेड दर्शन रांगेत एलसीडीद्वारे श्री. विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन अशा सुविधा पुरवण्यात येत आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news