अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठ्यांना सजा कार्यालयात उपस्थितीबाबत वेळापत्रक निश्चित करून, ते संबंधित ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावावे लागणार आहे. नियोजित दौरा, बैठका, कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय, तसेच ग्रामपंचायतीत सूचना फलक लावावा लागणार आहे. तसेच, तलाठी कार्यालयात आपला दूरध्वनी, मोबाईल नंबर ठळक स्वरूपात लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पद आहे. जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तसेच, शेतकर्यांशी निगडीत ई-पीक पाहणी, नुकसानीचे पंचनामे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, पुनर्वसन आदी कामे करण्यासाठी तलाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, तलाठी सजाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याच्या जनतेसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत.
राज्यात तलाठ्यांची सुमारे 35 टक्के पदे रिक्त असल्याने, एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सजांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. तलाठ्यांना सजातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयातील बैठका, राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या आदी कामांसाठी उपस्थित राहावे लागते. अशा वेळी तलाठ्यांना सजा कार्यालयात उपस्थित राहता येत नाही. एकापेक्षा अनेक गावांसाठी एकच तलाठी असल्याने, तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सजाच्या ठिकाणी ठरावीक वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
रिक्त तलाठी पदाची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवार उपलब्ध होईपर्यंत, एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सजांचा कार्यभार राहणार आहे. मात्र, जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तलाठ्यांनी सजाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा